बीड : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 8 आमदारांसह अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2 जुलै रोजी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis government) सहभागी झाले, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. त्यानंतर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दाव करण्यात आला. सध्या हे प्रकरण निवडणूक आयोगात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह कोणत्या गटाला मिळणार यासाठी दावे-प्रतिदावे होत आहेत. दरम्यान, अजित गटाचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी बीडमध्ये रविवारी (27 ऑगस्ट) पार पडलेल्या सभेत पक्षासह चिन्हही आम्हालाच मिळणार असा दावा केला आहे. एवढंच नाही तर त्यांनी तारखही सांगितली आहे. (Ajit Pawar group will also get a symbol Praful Patel also mentioned the date while claiming)
शरद पवारांच्या बीडमधील सभेनंतर अजित पवार गटाकडून उत्तरसभेचं रविवारी आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत अजित पवार गटाचे अनेक महत्वाचे नेते देखील उपस्थित होते. काही नेत्यांनी आपल्या भाषणातून राष्ट्रवादीमधील बंडखोरीवर भाष्य केलं तर, काहींनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला. दम्यान राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी देखील पक्ष आणि चिन्हाबाबत भाष्य केले. त्यांनी म्हटले की, बंडखोरीनंतर लोकांच्या मनात शंका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने कोणाकडे राहणार आहे. पण मी सर्वांना आवर्जून सांगतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाकडून 30 सप्टेंबरपर्यंत निकाल येईल. हा निकाल शंभर टक्के अजित पवार गटाच्या बाजूने लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडेच राहणार आहे.
हेही वाचा – INDIA vs NDA : भाजपाला मोठा धक्का? चार ते पाच पक्ष ‘INDIA’च्या संपर्कात असल्याचा काँग्रेसचा दावा
आम्ही सर्वांनी विचारपूर्वक निर्णय घेतला
राजकारणात सुरू असलेल्या चर्चेवर बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की, आमच्याबद्दल अनेक गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. अनेकजण आपापल्या भूमिका मांडत असले तरी आम्ही विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून अजित पवारांसह आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आहे. काही लोक म्हणतात पक्षात फूट नाही आणि हेच खरं आहे. त्यामुळे या निर्णयाचे समर्थन आपण सर्वांनी करावे. कारण राजकारणात असे अनेक प्रसंग येत असतात, अनेक घडामोडी घडत असतात. त्यामुळे आयुष्यात कधीतरी महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात. आम्ही सर्वांनी देखील मिळून हा सामूहिक निर्णय घेतला आहे. हा लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेला निर्णय आहे, असेही प्रफुल्ल पटेल म्हणाले.