मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षाप्रमाणेच यांच्यातही दोन गट तयार झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट पडली नसल्याचा दावा शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्याकडून वारंवार करण्यात येत होता. मात्र, शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीचे प्रकरण देखील आता निवडणूक आयोगामध्ये पोहोचले आहे. त्यामुळे खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची? याबाबतचा निर्णय हा निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणार आहे. निवडणूक आयोगामध्ये आता राष्ट्रवादी पक्षाबाबतच्या सुनावण्या पार पडत आहेत. मागील सुनावणीवेळी अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आली होती. परंतु, ही प्रतिज्ञापत्र खोटी असल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला होता. शरद पवार गटाच्या या आरोपांना आता अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Ajit Pawar group’s reply to Sharad Pawar group on criticism on fake affidavit)
हेही वाचा – शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला, कीर्तिकर-कदम वादावर ठाकरे गटाचा टोला
अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात खोटी प्रमाणपत्र सादर करण्यात आली होती, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीका केली होती. परंतु, त्यांच्या या टीकेला अजित पवार गटाचे आमदार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, “झोमॅटो असो, स्विगी असो, आमच्या पक्षात त्या प्रत्येक कामगारांचा विभाग आहे. त्यामुळे आमच्या पक्षाकडून ते प्रतिज्ञापत्र दाखल केले असतील. प्रतिज्ञापत्र खरी आहेत की खोटी हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही व्यक्तीला पक्षाला नाही. ते निवडणूक आयोग ठरवेल.”
तसेच, अजित पवारांचा आवाज जवळून ऐकला, तर तो आवाज बसलेला होता हे लक्षात येईल. मला वाटते आता ते व्यवस्थित झालेले असतील. अजित पवारांचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे अजित पवार आत एक आणि बाहेर एक असे करणारे नाहीत. सरळ तोंडावर सांगणारे निर्भिड व्यक्ती आहेत. ते नाटक करणारी व्यक्ती नाही. त्यांनी आयुष्यात कधीही नाटक केले नाही. त्यांना खरोखर डेंग्यू झाला होता. आम्ही स्वतः दोन तीन वेळा त्यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठका घेतल्या. त्यावेळी ते आजारी होते, असे सांगत त्यांनी अजित पवार यांच्या आजारपणाविषयीची माहिती दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. ज्यामुळे ते बरेच दिवस कोणत्याही शासकीय कार्यक्रमात किंवा अन्यत्र कुठेही दिसून आले नाही. राज्यात मराठा आरक्षणाविषयीचा प्रश्न तापलेला असतानाही त्यांनी याबाबत देखील कोणतेच मत व्यक्त केले नाही. मात्र, 10 तारखेला म्हणजेच दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांनी थेट दिल्लीला रवाना होत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे नेते देखील उपस्थित होते. त्यामुळे तब्येत बरी नसताना देखील अजित पवार हे दिल्लीला गेल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या होत्या.