नागपूर : छत्रपती संभाजीनगर येथे काल (ता. 16 ऑगस्ट) शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अजित पवार गटाला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा दिलेला आहे. “खबरदार, माझा फोटो वापराल तर कोर्टात खेचेन…” असे स्पष्टपणे आता शरद पवार यांच्याकडून सांगण्यात आलेले आहे. पण त्यांच्या या इशाऱ्याला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील मंत्र्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. ( Ajit Pawar group’s response to Sharad Pawar’s warning)
हेही वाचा – अजित पवार यांना शरद पवारांचा स्पष्ट इशारा, म्हणाले – “कोर्टात खेचेन…”
अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, “शरद पवार हे आमचे गुरू आहेत. गुरुचे फोटो छापणारच. कायदेशीर कारवाई करतील तेव्हा बघू कोर्टाकडून काय निर्देश येतात ते. पण ते आमचे गुरू आहेत. त्यांचा फोटो लावणारच,” असे त्यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तसेच, शरद पवार यांचे आशीर्वाद राहिले पाहिजे. सध्या त्यांचे आशीर्वाद आहेत. ते एनडीएत येणार की नाही सांगू शकत नाही. त्याबाबत नेते निर्णय घेतील, असेही आत्राम यांनी प्रसार माध्यमांसमोर म्हटले आहे.
तर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी सुद्धा शरद पवार यांच्या इशाऱ्याला उत्तर दिले आहे. माझ्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये सर्वात मोठा शरद पवार यांचा लावणार आहे. आता ते काय करणार. कुठे कुठे जाऊन ते फोटो काढणार? ते आमचे नेते आहेत, गुरु आहेत, त्यांच्याविषयी आस्था असल्याने आम्ही प्रमाने त्यांचा फोटो लावतो. त्यामुळे प्रेमाने, आस्थेने त्यांचा फोटो लावणे गुन्हा आहे आहे का? असा प्रश्न भुजबळ यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडली. ज्यानंतर त्यांनी भाजप-शिंदे गटासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर नेमका हक्क कोणाचा? असा प्रश्न निर्माण झाला. शरद पवार यांनी जरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला असला तरी खरा राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांचाच आहे, असे वारंवार सांगण्यात येत आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडले नसल्यास दावा देखील करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर अजित पवार गटाकडून शरद पवार यांचा फोटो वापरण्याचे काम सुरू अद्यापही आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये माझ्या परवानगीशिवाय कोणीही माझ्या फोटो वापरू नये असे शरद पवार यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आलेले होते. परंतु शरद पवार यांच्या या वक्तव्याच्या विरोधात जाऊन अजित पवार गटाकडून आजही त्यांचा फोटो वापरण्यात येत आहे.