परभणी : परभणीमधून महायुतीचे उमेदवार म्हणून रासपच्या महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शनिवारी (30 मार्च) पत्रकार परिषद घेत महादेव जानकर यांच्या नावाची घोषणा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जानकरांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. यानंतर महायुतीकडून महादेव जानकर यांच्या समर्थनाथ शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण केले. पण या भाषणातून त्यांनी परभणीची जागा ही राष्ट्रवादीची होती, असे सांगत आपल्या मनातील खंत अप्रत्यक्षपणे बोलून दाखवली. (Ajit Pawar indirectly expressed his displeasure for not getting Parbhani Lok Sabha seat)
हेही वाचा… Lok Sabha 2024 : अयोध्या पौळ कल्याणहून ठाकरे गटाच्या उमेदवार, 1 एप्रिलला फेसबूक पोस्ट
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परभणीत भाषण करताना महादेव जानकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे त्यांचे अभिनंदन केले. तसेच, ही जागा राष्ट्रवादीची होती, असे सांगत ते म्हणाले की, आम्ही बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारे लोकं आहोत. त्यामुळे उमेदवार देत असताना वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व द्यायचे, वेगवेगळ्या समाजाला प्रतिनिधित्व द्यायचे, कारण शेवटी हे बहुजनांचे राज्य आहे. त्यामुळे त्याच उद्देशाने या ठिकाणी उमेदवार देण्याचे निश्चित झाले. या जागेसाठी अनेक जण इच्छुक होते. प्रत्येकाला इच्छा असणे हे काही चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे, तो त्यांचा हक्क आहे. परंतु एकदा युतीच्या वरिष्ठांनी घेतलेला निर्णय अंतिम मानायचा असतो, असेही अजित पवारांकडून सांगण्यात आले.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणीतील नेते राजेश विटेकर यांना अजित पवारांकडून लोकसभेची तयारी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पण ऐनवेळी महायुतीच्या वरिष्ठांनी रासपचे नेते महादेव जानकर यांना उमेदवारी दिल्याने राजेश यांना अजित पवारांनी माघार घेण्यास सांगितली. याबाबतची माहिती देत अजित पवार म्हणाले की, महादेव जानकरांच्या उमेदवारीचा निर्णय हा वरीष्ठ पातळीवर झाला. पण या लोकसभेतून जानकरांना प्रतिनिधित्व देणे गरजेचे होते. महाराष्ट्राच्या हिताचे होते, समाजाच्या भल्याचे होते, त्यावेळेस राजेश विटेकर यांना थांबण्यास सांगितले. परंतु, सहा महिन्यांच्या आत राजेश विटेकर यांना विधिमंडळावर पाठवण्याचा निर्णयही अजित पवारांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे आजच्या परभणीच्या सभेतून अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे लोकसभेबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे.