बारामतीच्या विकासकामांवर दादांचा वॉच, रात्री ११ वाजता साईट विझीट

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या कामाबद्दल नेहमीच प्रामाणिक असतात. प्रत्येक कामावर करडी नजर ठेवून ते काम दर्जेदार झाले पाहीजे हा त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे पहाटेपासून अजित पवार आपल्या कामाला सुरुवात करतात. काल रात्री अकरा वाजताच्या सुमारास अजित पवार बारामतीतील कामांची पाहणी करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. शहरातील विद्या प्रतिष्ठान परिसरात सुरू असलेल्या कामाची अजित पवार यांनी पाहणी केली. या कामाची त्यांनी बारकाईने पाहणी करताना या व्हिडिओत पहायला मिळत आहे.

अजित पवार सध्या बारामती आहेत. काल त्यांनी विविध ठिकाणच्या कामांचे उद्घाटन केले. तसेच भाषणांमधून त्यांनी विरोधकांना टोलेही लगावले. अर्थमंत्रालय आपल्याकडे बारामतीला झुकते माप देतो, असे त्यांनी काल बिनदिक्कतपणे सांगितले होते. बारामतीसाठी आपला हात ढिला होतो आणि त्यामुळे शहराचा विकास होत असल्याचेही ते म्हणाले.

बारामतीत सुविधा नाहीत म्हणून कुणाला मुंबई-पुण्याला जायला लागू नये, त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पाणी जपून वापरण्याचा सल्लाही पवारांनी बारामतीकरांना दिला होता. एका कार्यक्रमात त्यांनी पुढील २५ वर्षांचे बारामती परिसराचे नियोजन करत असल्याचे सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळपासून अजित पवारांनी बारामतीचा दौरा केला असून त्यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली.


हेही वाचा : राणा दाम्पत्याला मिडीयाला बाईट देणं पडणार महाग, जामीन होणार रद्द