मंत्रीपदासाठी पुढे पुढे असणारे निर्लज्जपणे…, मंत्र्यांच्या गैरहजरीवरून अजित पवार आजही संतापले

Maharashtra Assembly Budget 2023 | मंत्रीपदासाठी पुढे पुढे करणारे सभागृहात गैरहजर राहतात. यांना जनाची नाही निदान मनाचीही लाज वाटत नाही का? असा कडवा सवाल विचारतानाच त्यांनी मंत्र्यांच्या निर्लज्जपणा आणि निष्काळजीपणावरही ताशेरे ओढले.

ajit pawar

Maharashtra Assembly Budget 2023 | मुंबई – सभागृहात मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा आजही विधानसभेत कामकाजाच्या सुरुवातीलाच गाजला. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सभागृहात संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आणि लक्षवेधीला गैरहजर राहणाऱ्या मंत्र्यांविरोधात संताप व्यक्त केला. मंत्रीपदासाठी पुढे पुढे करणारे सभागृहात गैरहजर राहतात. यांना जनाची नाही निदान मनाचीही लाज वाटत नाही का? असा कडवा सवाल विचारतानाच त्यांनी मंत्र्यांच्या निर्लज्जपणा आणि निष्काळजीपणावरही ताशेरे ओढले.

विधानसभेचे मंगळवारचे कामकाज रात्री उशीरापर्यंत चालले. रात्री १ वाजून ३ मिनिटांनी हे कामकाज स्थगित झाले. त्यानंतर, आज सकाळी ९ वाजता विशेष कामकाज सत्र बोलावण्यात आले होते. या विशेष कामकाजात आठ लक्षवेधी ठरवण्यात आल्या होत्या. परंतु, त्यातील एकाच लक्षवेधीवर आज चर्चा होऊ शकली. कारण, सभागृहात संबंधित खात्यांचे मंत्रीच हजर नव्हते. सात मंत्री गैरहजर राहिल्याने त्या लक्षवेधी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात दिली. मंत्री गैरहजर राहिल्याने लक्षवेधीवर चर्चा होऊ शकली नाही, यावरून त्यांनी संताप व्यक्त केला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील आज सकाळच्या सत्रांत उपस्थित नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंत्रीपद घेताना पुढे पुढे करायचं आणि सभागृहात हजर राहायचं नाही. जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटत नाही का? अतिशय गलिच्छपणाचं काम सुरू आहे. विधिमंडळाच्या कामकाजात यांना रस नाहीय. त्यांना बाकीच्या कामात रस आहे. निर्ल्लज्जपणाचा कळस झाल्यावर आमचाही नाईलाज होतो, अशी संतप्त प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

रात्री एक वाजता ऑर्डर ऑफ डे निघाला. त्यामुळे मंत्र्यांना ब्रिफिंग घ्यायला वेळ मिळाला नाही, अशी सारवासारव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात आली. ऑर्डर ऑफ डे रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान काढल्यास मंत्र्यांना ब्रिफिंगसाठी वेळ मिळतो. मात्र, रात्री एक वाजता ऑर्डर निघाल्याने मंत्र्यांना वेळ मिळत नाही. परंतु, तरीही आम्ही मंत्र्यांना समज देऊ, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी सभागृहात येत असतात. एखाद्या विषयावर चर्चा झाली नाही तर जनतेवर अन्याय करत आहोत ही माझी भूमिका आणि ठाम मत आहे. यावर्षीच्या अधिवेशनात २३७६ लक्षवेधी ऑनलाईन प्राप्त झाल्या. २६१ विनंत्या आल्या आहेत. गेल्या सात आठ दिवसांत ५७ लक्षवेधी घेतल्या आहेत. दररोज तीन लक्षवेधी घेणं अपेक्षित असतं. यात वाढ करण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे. परंतु, सदस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे मंत्र्यांचं सहकार्य प्राप्त होईल, यापुढेही जास्तीत जास्त लक्षवेधी घेण्याचा प्रयत्न करू, वेळेत ऑर्डर ऑफ दि डे मिळेल. लक्षवेधींचाही दिवस ठरवून यंत्रणा लावली जाईल, अस विविध आश्वासनं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे.