मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक यादरम्यान वातावरण बदलले आहे, असे वाटते का? राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल काय वाटते? विधानसभा निवडणुकीत माझी लाडकी बहीण योजनेचा कितपत प्रभाव राहील? महाविकास आघाडीने केलेल्या मोफत योजनांच्या घोषणांबाबत काय वाटते? अदानी यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीचे वास्तव काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी दिली आहेत. ‘आपलं महानगर’ आणि ‘माय महानगर डॉट कॉम’चे संपादक संजय सावंत यांनी त्यांच्या घेतलेल्या विशेष मुलाखतीत अजित पवार यांनी आपली मते मांडली आहेत. (Ajit Pawar NCP Exclusive interview with My Mahanagar on Ladki Bahin Yojna and MVA)
हेही वाचा : Uddhav Thackeray : तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली; असं कोणाला म्हणाले उद्धव ठाकरे?
- लोकसभेत राष्ट्रवादीने 4 जागा लढवल्या आणि एका जागेवर विजय मिळवला. मागील सहा महिन्यात असे काय वातावरण बदलले की ज्यामुळे तुम्ही आश्वासक दिसत आहात?
मागील सहा महिन्यात वातावरण नक्कीच बदलले आहे. कांदा निर्यातबंदीचा खूप मोठा फटका आम्हाला सहा जिल्ह्यांमध्ये बसला होता. आता ती बंदी उठवण्यात आल्याने कांदा उत्पादक शेतकर्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत आहे. परिणामी कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याशिवाय विरोधकांनी संविधान बदलणार आणि आरक्षण बदलणार असे फेक नॅरेटिव्ह सेट केले होते. भाजपने अब की बार चारसौ पारची घोषणा लोकसभा निवडणुकीत दिली होती, पण हे चारसौ पार कशासाठी? तर यांना राज्यघटना बदलायची आहे आणि हे हिंदू राष्ट्र म्हणून जाहीर करायचे आहे. त्याद्वारे केवळ हिंदूंनाच मतदानाचा अधिकार द्यायचा असे पसरवले गेले. तसेच सीएए अर्थात नागरिकत्व (सुधारणा) कायदा लागू करण्यात येणार होता. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांतून 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन समुदायाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही तसेच त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल अशा प्रकारची तरतूद सुधारित नागरिकत्व कायद्यात करण्यात आली आहे, मात्र या कायद्याच्या आधारे तुम्हाला देशाबाहेर पाठवणार असल्याची भीती मुस्लीम समाजाला दाखवण्यात आली. अशा प्रकारे चुकीच्या गोष्टींचा विपर्यास करण्यात आला होता. त्याला काही लोक बळी पडले. त्यामुळे महायुतीला फटका बसला होता.
- मराठा आरक्षण किंवा जरांगे फॅक्टर तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दिसत आहे का?
मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील हे त्यांच्या पद्धतीने काम करीत आहेत. इतर लोकही आपापल्या पद्धतीने कामे करीत आहेत. मध्यंतरी मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवण्याचे जाहीर केले. लोकांनी माझ्याकडे यावे, मी उमेदवार जाहीर करेन, असे ते म्हणाले होते, पण लोकांची खूप गर्दी झाली, असे वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रात आले होते. प्रमुख लोकही भेट घेतात आणि आम्हाला पाठिंबा द्या, अशी मागणी करतात हेही पाहायला मिळाले. महत्त्वाचे म्हणजे लोकसभा आणि विधानसभेला मतदान करताना लोक वेगवेगळा विचार करतात. 1999 ला आपल्याकडे एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा झाली होती. त्यावेळी लोकसभेला भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार आले, तर विधानसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कौल दिला होता. हा इतिहास नाकारता येणार नाही.
- राष्ट्रवादी काँग्रेसची अल्पसंख्याकांबाबतची भूमिका काय?
मी सोशल इंजिनिअरिंगचा विचार केलेला आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहोत. जागावाटपात मला जेवढ्या जागा मिळाल्या त्यात साडेबारा टक्के आदिवासी, साडेबारा टक्के मागासवर्गीयांना, १० टक्के जागा मुस्लीम समाजाला, 10 टक्के जागा महिलांना दिल्या आहेत. सरकारबद्दलही बोलायचे झाले तर ते सकारात्मक आहे. सर्व घटकांना पुढे घेऊन जाण्याचा सरकारचा विचार आहे. त्या दृष्टीने आमची पावलेदेखील उचलली गेली आहेत.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
नवाब मलिक यांच्यावर आरोप झाले आहेत, पण गुन्हा सिद्ध झालेला नाही. गुन्हा सिद्ध न होताही एखाद्यावर झालेल्या आरोपामुळे त्याला दोषी ठरवायचे हे बरोबर नाही. नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत काहीही झाले तरी त्यांना आरोपी समजू नये अशी माझी विनंती आहे.
- विधानसभा निवडणुकीवर लाडकी बहीण योजनेचा कितपत प्रभाव राहील?
या निवडणुकीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरणारी आहे. जवळपास 45 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. अडीच कोटी माता-भगिनींना लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 2 कोटी 30 लाख महिला याचा लाभ घेत आहेत. निवडणुकीनंतर हे उद्दिष्ट पूर्ण होईल.
- यासाठी लागणार्या निधीबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला होता.
माझा जो अभ्यास आहे त्यानुसार गेल्या वर्षी साडेसहा लाख कोटी रुपयांचे बजेट होते. यावेळी ते बहुधा 7 लाख कोटी होईल. त्यातील जवळपास निम्मी रक्कम पगार, निवृत्तीवेतन तसेच घेतलेल्या कर्जाचे व्याज देण्याकरिता खर्च करावी लागते. उरलेली निम्मी रक्कम विकासकामांसाठी उपयोगी पडते. आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत त्या योजनांसाठी दरवर्षी 75 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात. त्यात 3, 5, 7.5 अश्वशक्तीपर्यंतची वीजबिल माफी, लेक माझी लाडकी योजना आहे. दुधाचा दर आम्ही वाढवून दिला. पूर्वी 28 रुपये दर होता, आता 35 रुपये द्यायचे म्हणतो.
- विविध योजनांद्वारे लाभार्थ्यांना थेट पैसे दिले जातात, याला करदात्यांचा विरोध आहे. यापूर्वीदेखील काही जण कोर्टात गेले आहेत. अशा प्रकारे थेट खात्यामध्ये पैसे जमा करून मतदारांना प्रलोभित करणे योग्य वाटते का?
देश आणि राज्यांचा विचार केला तर लोकाभिमुख कारभार करण्यासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात. आम्ही ज्या योजना दिल्या त्या विचारपूर्वक, 75 हजार कोटींचा भार राज्य सरकार उचलेल हा विचार करूनच दिलेल्या आहेत. त्या पुढेही आम्हाला चालू ठेवायच्या आहेत, म्हणून तर पुन्हा आम्हाला संधी द्या, असे आवाहन लोकांना करीत आहोत.
हेही वाचा : CM Eknath Shinde on Raj Thackeray : एकनाथ शिंदेंनी सांगितले राज ठाकरेंसोबत संबंध बिघडले का?
- विरोधकांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करण्याचे जाहीर केले आहे, हे शक्य आहे का? अर्थमंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल?
हे अजिबात शक्य नाही. आम्ही ज्या योजना दिल्या आहेत त्या 75 हजार कोटी रुपयांच्या आहेत, तर त्यांनी ज्या पंचसूत्री योजना आणल्या आहेत त्यांची बेरीज केली तर त्यांना जवळपास 3 लाख कोटी रुपये लागतील. आता ते महिलांना ३ हजार रुपये द्यायचे सांगत आहेत. लाडकी बहीण योजनेंतर्गत देण्यात येणार्या दीड हजार रुपयांसाठी आम्हाला 45 हजार कोटी रुपये लागतात. त्यानुसार त्यांना साधारणपणे एक लाख कोटी लागतील. त्यांनी हे गणित कसे केले आहे, मला तर हे कळायलाच मार्ग नाही. कारण 3 लाख कोटी रुपये कर्मचार्यांचे वेतन आणि निवृत्तीवेतनावर खर्च केले तर पुढे राज्य कसे चालवणार?
महायुतीने दीड हजार रुपये द्यायचे म्हटल्यावर तुम्ही राज्याला कर्जबाजारी केले, कंगाल केले, दिवाळखोरीत काढले, असे विरोधक म्हणायला लागले. तेच आता 3 हजार रुपये देण्याचे सांगत आहेत. पदवीधर मुलांना दरमहा 4 हजार रुपये द्यायला निघाले आहेत. महायुती सरकार 75 हजार कोटी रुपये एवढा कमी खर्च विविध योजनांवर करीत आहे. त्यांनी कसाबसा ताळेबंद जुळवला आहे हे विरोधकांच्या लक्षात येत नाही. कसे करणार? काय करणार? हे कोणी सांगायला तयार नाही. लोकप्रतिनिधीही याबाबत काही स्पष्टपणे बोलत नाहीत. तेच सांगतात आमची आता एवढी योजना आहे. त्यासाठी किती खर्च येतो हे तुमच्या पक्षाला विचारले का, असे म्हटल्यावर नाही असे उत्तर देतात, पण करायचे आहे, एवढेच उत्तर देतात.
- भाजपसोबत जाण्यासाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी उपस्थित होते, असे तुम्ही म्हणाला होतात. हा संदर्भ 2019चा आहे की 2022 चा आहे?
प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या गेस्ट हाऊसमध्ये 2019 ला आमची एक बैठक झाली होती एवढाच संदर्भ आहे. बाकीच्या बैठका वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या होत्या, पण त्यावेळी गौतम अदानी आणि त्यांच्या समूहाशी संबंधित कोणाही व्यक्तीचा या बैठकांशी संबंध नव्हता.
- भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा, अजित पवार आणि कंपूने गौतम अदानी यांच्या सहकार्याने माझे सरकार पाडले, असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणत आहेत. त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
तसे झालेले नाही. त्या बातमीमुळे उद्धव ठाकरे यांचा तसा समज झाला असेल. त्यांचे सरकार आल्यानंतर ही बैठक झाली असावी असे कदाचित त्यांना वाटत असेल, पण वास्तव ते नाही. 2019 चा निकाल लागल्यानंतर दिल्लीमध्ये पाच-सहा वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी आम्ही सर्व राजकीय लोक होतो. गौतम अदानी यांचा संबंध नसताना त्यांचे नाव यात गोवण्याचे कारण नाही. यामध्ये उद्योगपतींचा काहीच संबंध नसतो. उद्योगपती आपला व्यवसाय सांभाळत असतात. राजकीय नेते आपापली कामे करीत असतात, पण माझ्या तोंडून गेस्ट हाऊस सांगताना त्यांचे नाव गेले आणि ‘ध’ चा ‘मा’ झाला.
- अदानी यांचे नाव समोर आल्यावर दबाव आला असे म्हटले जाते…
अदानी यांचा काहीही संबंध नाही आणि हे सांगण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. कशाचा दबाव? मी कोणत्या दबावाखाली दबलो आहे?
- लोकसभेचा विचार करून बारामतीवर लक्ष केंद्रित केले आहे का?
बारामती हे माझे घर आहे, बारामती हा आमचा परिवार आहे. बारामतीच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले आहे. 1991 मध्ये माझी पाटी कोरी असताना, मला जास्त अनुभव नसताना बारामतीकरांनी मला लोकसभेवर पाठवले होते. बारामतीचा सर्वांगीण विकास व्हावा हेच ध्येय उराशी बाळगून आम्ही काम करतो. शिक्षणाचे माहेरघर, शिक्षणासाठी सर्वाधिक सुविधा असलेले शहर म्हणून ते ओळखले जाते.
- बारामतीमध्ये तुमच्या काकांनी थेट नातवाला तुमच्या विरोधात उभे केले आहे. युगेंद्र पवार यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असेल का?
या निवडणुकीत प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला निवडून आणण्याचा प्रयत्न करीत आहे.
- भावनिकतेवर निवडणूक लढवली जात आहे, असे तुम्ही लोकसभा निवडणुकीवेळी बोलत होतात आणि आता तुम्हीच भावनिकतेच्या मुद्यावर निवडणूक लढत आहात असे दिसते…
दीड वर्षाने संसदीय राजकारणातून मी बाजूला होणार असल्याचे शरद पवार साहेबांनी स्वत:च म्हटले आहे. संसदीय कामकाजातून बाजूला झाल्यावर लोकांचा ओढा कमी होतो. त्यासंदर्भात यापुढे माझ्याकडेच जबाबदारी असेल, असे मी बोललो होतो.
- शरद पवार यांनी बारामतीमध्ये पाया रचल्याने तुम्ही विकास पुढे नेला, असा नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. पवार साहेबांचे बारामतीसाठी योगदान आहे का?
सगळ्यांचे सगळ्यासाठी योगदान असते. योगदान नाही, असे कसे म्हणू शकतो?
- तुमच्या गुलाबी जॅकेटबद्दल टिप्पण्या केल्या जातात. तुमच्या स्वभावाला ते सूट होत नाही, असे अनेकांचे मत आहे. सल्लागारांच्या सांगण्यावरून तुम्ही करीत आहात, अशी चर्चा आहे…
मला जे योग्य वाटते ते मी करीत असतो. मला ते जॅकेट आवडले म्हणून ते घालायला सुरुवात केली.