Homeमहाराष्ट्रमराठवाडाNCP Ajit Pawar : मराठवाड्याची अजित पवारांना भक्कम साथ; मुंडे, बनसोडे, चिखलीकर,...

NCP Ajit Pawar : मराठवाड्याची अजित पवारांना भक्कम साथ; मुंडे, बनसोडे, चिखलीकर, कोणाला मंत्रिपदाची लॉटरी

Subscribe

मुंबई / छत्रपती संभाजीनगर – महायुतीला बहुमत मिळूनही सत्तास्थापनेचा दावा करण्यास उशिर होत आहे. यामुळे सत्ताधारी आमदारांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरु झाले आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. त्याचाही विचार मंत्रिपद देताना होण्याची शक्यता आहे. मराठवाड्याने अजित पवारांना भक्कम साथ दिली आहे. त्यामुळे मराठवाड्यात अजित दादांची राष्ट्रवादी किती मंत्रिपदे देणार याची आमदारांना उत्सूकता लागली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 उमेदवार निवडून आले आहेत. अजित दादांना मराठवाड्याने मोठी साथ देत आठ उमेदवार निवडून दिले आहेत. महायुतीच्या नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादीला 10 ते 12 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर अजित पवार आपल्या कोट्यातून कुणाला संधी देतात, याकडे सर्व आमदारांचे लक्ष लागले आहे. मराठवाड्यातील नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अजित पवार तीन जिल्ह्यांत एक मंत्रिपद देऊ शकतात.

मराठवाड्याची अजित दादांना भक्कम साथ

विधानसभा निवडणुकीत 46 जागा असलेला मराठवाडा महत्त्वाचा मानला जात होता. लोकसभेत मराठवाड्याने महायुतीला हात दिला होता. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे पराभूत झाल्या होत्यात. या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक तीन आमदार विजयी झाले. यात परळीतून धनंजय मुंडे, गेवराई मतदारसंघातून विजयसिंह पंडित, आणि माजलगावमधून प्रकाश सोळंके विजयी झाले. नांदेडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार प्रतापराव चिखलीकर लोहा विधानसभा मतदारसंघात विजयी झाले. लातूर जिल्ह्यात संजय बनसोडे यांनी उदगीरचा गड कायम राखला. बाबासाहेब पाटील अहमदपूर मधून विजयी झाले. परभणी जिल्ह्यात राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यात चंद्रकांत नवघरे आमदार आहेत, असे एकूण 8 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत.

या आठ जणांपैकी किमान तिघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याचा अंदाज बांधला जात आहे. यामध्ये बनसोडे आणि मुंडे हे मागील सरकारमध्ये मंत्री होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातून दोन जुन्या अन् एका नवीन चेहऱ्याचा समावेश असू शकतो अशी माहिती आहे.

कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी

भाजपमधून ऐनवेळी राष्ट्रवादीत आलेले प्रतापराव चिखलीकर हे मंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात आहेत. दुसरीकडे परभणीतील पाथरीचे राजेश विटेकर आणि हिंगोली जिल्ह्यातून पुन्हा आमदार झालेल्या वसमतच्या राजू नवघरे यांचाही विचार केला जाऊ शकतो. त्यात युवा चेहरा आणि आजपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ न सोडलेल्या राजू नवघरे यांना प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला होणार असल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करुन सांगितले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिली. राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार असून मुख्यमंत्रिपद भाजपकडे असणार आहे, हे जवळपास निश्चित आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव फायनल असल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा : Maharashtra CM : तापावर उतारा पाहिजे तर… एखादं मुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद उतरून टाका..! कोणी दिला हा सल्ला

Edited by – Unmesh Khandale