पुणे : खातेवाटप झाल्यानंतर कोण-कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री होणार? यावरून बरीच खलबते सुरू होती. अखेर पालकमंत्रिपदे जाहीर झाली; पण अजितदादांच्या मंत्र्यांना स्व:जिल्ह्यातील पालकमंत्रिप न दिल्यानं नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अशातच हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनीही खदखद व्यक्त केली होती. माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे, असं विधान झिरवाळ यांनी केले होते. पण, असे वक्तव्य योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजितदादा म्हणाले, “असं काहीही होणार नाही. जर मंगळवारी आमची बैठक असते. अशा पद्धतीचे व्यक्तव्य केले असेल, तर योग्य नाही. त्यांचा गैरसमज झाला असेल, तर चर्चा करून दूर करेल.”
हेही वाचा : महायुतीत वाद! गोगावलेंनी आपली उंची पाहून बोलावे, अजितदादांच्या नेत्यानं फटकारलं
झिरवाळ काय म्हणाले होते?
हिंगोलीचे पालकमंत्रिपद मिळाल्याबाबत वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्याकडून झिरवाळ यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोली सारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे, अशी खदखद झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे.
“मी पहिल्यांदा मंत्री झालो. पहिल्यांदा पालकमंत्री झालो. मला इथे आल्यावर समजलं की, माझ्यासारख्या गरिबाला हिंगोलीसारख्या गरीब जिल्ह्याचे पालकमंत्री केले आहे. आता मुंबईला गेल्यावर वरिष्ठांना विचारणार आहे की तुम्ही गरीबाला गरीब जिल्हा का दिला?” असं झिरवाळ यांनी म्हटलं.
राऊतांची झिरवाळांवर टीका…
झिरवाळांच्या विधानावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. “झिरवाळांना गरीब म्हणणे हा गौतम अदानींचा अपमान आहे. शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसला हे गरिबांचे लक्ष नाही,” असं राऊत यांनी सुनावलं होते.
हेही वाचा : छावा चित्रपटातील ‘त्या’ सीनबाबत उदयनराजेंचा थेट दिग्दर्शकाला फोन; म्हणाले, एका दृष्यात…