पुणे : अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला संशयास्पद आहे. सैफने स्वत:ला चाकू मारून घेतला का? अशी शंका मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केली होती. यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यात कुठलीही संशयास्पद माहिती पुढे आली नाही. मी राणेंशी बोलेन. मात्र, हल्लेखोर सापडल्यामुळे शंकेला वाव नाही, असं अजितदादांनी स्पष्ट केले. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजितदादा पवार म्हणाले, “मी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा पालकमंत्री या नात्यानं बोलत असतो. वेगवेगळ्या व्यक्तींनी वक्तव्य केलेली असतात, त्यावर मी काय बोलणार? बुधवारी नितेश राणे बंदर आणि इतर विभागांच्या आढाव्यासाठी आले होते. परंतु, राणेंनी सैफ अली खानविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल मला काही माहिती नाही. मी त्यांना विचारेन. नितेश राणेंच्या मनात काही शंका असेल, तर डिपार्टंमेंटला सांगावे.”
हेही वाचा : जळगाव रेल्वे दुर्घटनेत काय घडलं? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती
“वास्तविक ती व्यक्ती ( सैफ अली खानचा हल्लेखोर ) सापडलेली आहे. तो बांगलादेशवरून आला होता. मुंबईबद्दल आकर्षण बहुतेक सगळ्यांना असतं; आजूबाजूच्या देशातील लोकांनाही आहे. त्यामुळे तो आला, पण मुंबई पाहून त्याला बांगलादेशला परत जावंसं वाटलं, त्यासाठी त्याला 50 हजार रुपये हवे होते, पण मागताना त्याने एक कोटी मागितले, हे सगळं पोलीस खात्याने मीडियाला सांगितलं आहे,” असं अजितदादांनी म्हटलं.
“आतापर्यंतच्या माहितीत तसं काही वावगं नाहीये, कदाचित सैफ आपल्या घरी जात असताना त्यांची तब्येत किंवा कपडे पाहता, यांच्यावर काही दिवसांपूर्वी असा हल्ला झाला होता, असं वाटलं नसेल; पण त्यांची तब्येत चांगली आहे, ते घडलंयच ना. पहाटे आमचे डिपार्टमेंटवाले हल्लेखोराला तिकडे पहाटे घेऊन गेले, तू कसा वर गेलास? कुठला जिना वापरला? तिथे शिरताना हे घर कोणाचं आहे माहिती होतं का? असे प्रश्न विचारले. तर हल्लेखोर म्हणाला की ‘मला हे घर कुणाचं माहिती नव्हतं, फक्त इथे श्रीमंत वर्ग राहतो हे माहिती होतं,’ अभिनेते-निर्माते राहतात एवढंच माहिती होतं,” असंही अजितदादांनी सांगितलं.
हेही वाचा : स्वत:कडे मुख्यमंत्रिपद न ठेवता बाळासाहेबांनी सामान्य शिवसैनिकाला मोठं केलं – संजय राऊत