पुणे : पुण्यात आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह बडे नेते सामील झाले होते. यावेळी शरद पवार आणि अजितदादा यांच्या आसनव्यवस्था शेजारी करण्यात आल्या होत्या. मात्र, नंतर दोघांमध्ये सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची खुर्ची ठेवण्यात आली. यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
शरद पवार आणि तुमची आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, नंतर तुमच्या नावाची पाटी बदलण्यात आली. तिथे बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवली. याबद्दल पत्रकारांनी विचारल्यावर अजितदादा म्हणाले, “बाबासाहेब पाटील यांना शरद पवार यांच्याशी बोलायचे होते. मी केव्हाही शरद पवार यांच्याशी बोलू शकतो. म्हणून बाबासाहेब पाटील यांना मध्ये बसवले होते. मी तिथे असलो, तरी मला बोलता येत होते. माझा आवाज असा आहे की, दोन खुर्च्या सोडल्या की तिसऱ्याला ऐकू जातो.”
हेही वाचा : मुलासमोर पत्नीच्या गळ्यावर कात्रीने वार, व्हिडिओही बनवला अन्…; पुण्यातील थरकाप उडवणारी घटना
तुम्ही दोन वर्षे वार्षिक सभेला आला नाही. आता विधानसभेला जास्त आमदार निवडून आल्यानंतर आला? असा प्रश्न विचारल्यावर अजितदादांनी म्हटलं, “मी काम होतो. माझे जास्त आमदार कसे निवडून येतील, त्याचा दोन वर्षे विचार करत होतो.” असं अजितदादांनी म्हटल्यावर एकच हशा पिकला.
“बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न सगळीकडे उद्भवला आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, दिल्लीसारख्या शहरात बांगलादेशी येत आहेत. सैफ अली खानवर हल्ला करणारा सुद्धा बांगलादेशी होता,” अशी माहिती अजितदादांनी दिली.
शरद पवार आणि तुमच्यात काय चर्चा झाली? असे विचारल्यावर अजितदादा म्हणाले, “साखर व्यवसायासंदर्भात शरद पवार यांची चर्चा झाली. सहकार, उत्पादन शुल्क, कृषी आणि उर्जा विभागाचा संबंध साखर उद्योगाशी येतो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसंबंधित प्रश्नावरही चर्चा झाली.”
हेही वाचा : अजितदादांची ‘ती’ मागणी अन् शरद पवारांनी झटक्यात केली मान्य