पुणे : राज्यात सध्या तीन चाकांचे सरकार आहे. या तीन चाकी सरकारला ‘त्रिशुळ’ असे नाव देण्यात आले आहे. पण या सरकारमध्येच इतके अंतर्गत वाद आहेत की, विरोधकांकडून आणि विशेषतः काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून या सरकारवर कायमच टीका करण्यात येत असते. नाना पटोले यांनी पुन्हा एकदा या राज्य सरकारला डिवचण्याचे काम केले आहे. राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार हे गम्मत जम्मतचे सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे, असा टोला लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. (Ajit Pawar response to Nana Patole statement)
हेही वाचा – ‘कोल्ड वॉर वैगरे असे काही नाही, मी अडीच वर्षे…’, मंत्रालयातील आढावा बैठकीबाबत अजित पवारांचे स्पष्टीकरण
अजित पवार आज पुण्याच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते चांदणी चौक येथील पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तब्येतीच्या कारणास्तव या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमाआधी अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आज विरोधकांकडे बोलण्यासाठी काही मुद्दा नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या बैठका घेत आहेत. आज सगळे मिळून काम करत आहेत. पण अंतिम निर्णय हा राज्याचे प्रमुख एकनाथ शिंदे हेच घेतील. त्याच्यामुळे त्याचा काही वेगळा अर्थ काढण्याती गरज नाही. विकासकामांना गती देण्यासाठी आपण जर आढावा घेतला तर यंत्रणा जोमाने काम करते, यंत्रणा कामाला लागली विकासकामे लवकर होतात आणि लोकांचा त्रास कमी होतो. असे अजित पवार यांनी सांगितले. त्यामुळे त्यांनी विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेला फारसे महत्त्व दिले नसल्याचेच दिसून आले आहे.
त्याचप्रमाणे, पुण्यात झालेला लोकमान्य टिळक पुरस्काराचा कार्यक्रम हा काही राजकीय नव्हता. त्यामुळे त्यावेळी जी काही विकासकामे पूर्ण झाले होते, तेव्हा त्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे ते काही राजकीय कार्यक्रम नव्हते. जेव्हा गृहमंत्री अमित शहा आले होते. ते त्यांच्या कामासाठी आले होते. तेव्हा त्यांच्याशी आम्ही विकासांच्या कामाची चर्चा केली असेही अजित पवारांकडून स्पष्ट करण्यात आले.
शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारकडून समिती बनविण्यात आली आहे. यामध्ये तिन्ही पक्षाचे 4-4 लोक आहेत. परंतु, ती समिती महामंडळांविषयीच्या कामांसाठी आहे. ही समिती निवडणुकीबाबत कोणताही निर्णय घेणार नाही. यामध्ये अजित पवार गटाकडून दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि सुनील तटकरे यांची नावे आहेत, अशी माहिती अजित पवारांकडून देण्यात आली आहे.