Monday, March 17, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रNitesh Rane : शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हते; अजित पवारांनी राणेंना दिला इतिहास वाचण्याचा सल्ला

Nitesh Rane : शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान नव्हते; अजित पवारांनी राणेंना दिला इतिहास वाचण्याचा सल्ला

Subscribe

मुंबई – हिंदूंनी हिंदूसाठी चालवलेले मटणाचे दुकान असे म्हणून मल्हार मटणाचा पुरस्कार करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हेत. स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच होती, असं विधान नितेश राणेंनी केलं आहे. मंत्री नितेश राणांचे या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फोडले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांना इतिहास शिकण्याचा सल्ला दिला आहे. इतिहास वाचला पाहिजे, तेव्हाच खरा इतिहास कळेल, अशा कानपिचक्या अजित पवारांनी नितेश राणेंना दिल्या आहेत.

‘ते’ पुस्तक माझ्याकडून वाचायचे राहिले – मुनगंटीवार 

नितेश राणेंच्या या वक्तव्याने नव्या वादाला सुरुवात झाली आहे. महायुतीतील नेत्यांनीच नितेश राणेंचे कान टोचले आहेत. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मी अधुन-मधून पुस्तकं वाचतो, पण नितेश राणेंनी वाचलेले पुस्तक कदाचित माझ्याकडून वाचायचे राहून गेलं असावं. कारण मी जे वाचलं त्यात शिवाजी महाराजांबरोबर काही मुस्लिम होते. एकही मुस्लिम नव्हता असं नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर लढणारे देशभक्त मुस्लिम होते, असंही मुनगंटीवार म्हणाले.

अजित दादांनी टोचले राणेंचे कान

नितेश राणेंच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना इतिहास वाचण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले की,  ‘इतिहास वाचला तर लक्षात येईल शिवरायांसोबत मुस्लीम होते. महाराजांच्या बरोबर जे लोक होते, त्यामध्ये मुस्लिम लोकही होते. महाराजांचा दारूगोळा कोण सांभाळत होतं? अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील, असं अजित पवार म्हणाले. तसेच ते म्हणाले की, त्यांनी का असं वक्तव्य केलं हे मला माहित नाही. पण भारतात असलेल मुस्लिम हे देशप्रेमीच आहेत, असेही अजित पवार म्हणाले. दोन्ही बाजूच्या सन्मानिय सदस्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कोणतंही वक्तव्य करु नये, असे कानही त्यांनी टोचले. अजित पवारांचा सल्ला नितेश राणे किती ऐकतात, हे पाहावे लागेल.

हेही वाचा : Jitendra Awhad : …आता मच्छी कशी कापायची; हलाल, हराम की मल्हार? जितेंद्र आव्हाडांनी का केला असा सवाल

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?

मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे म्हणाले की, ‘आमच्यातीलल काही कारटे आहेत, शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते सांगणारे. कोण मुसलमान नव्हते, उगाच ते टेपरेकॉर्डर चालवतात. हिंदू धर्माला नष्ट करण्याचे शपथ औरंगजेबाने घेतली होती. ज्या औरंगजेबाने हिंदू धर्माला संपवण्याची शपथ घेतली त्या औरंगजेबाला थांबवण्याचे आणि आव्हान देण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती आमच्या संभाजी महाराजांनीच केलं आहे. स्वराज्याची लढाई ही इस्लामच्या विरोधातच होती, हिंदू विरुद्ध मुसलमान अशीच ही लढाई होती. त्या लढाईमध्ये आमच्या राजांनी हिंदू धर्माला इस्लामच्या समोर झुकलायला दिले नाही. हाच आमच्या सगळ्यांचा ज्वलंत इतिहास आहे.’

हेही वाचा : Nitesh Rane : हिंदूंसाठी मल्हार सर्टिफिकेशन मटण; नितेश राणे म्हणाले, इथूनच खरेदी करा

हेही वाचा : Vijay Wadettiwar : सरकारला अडचणीत आणण्यासाठी विरोधकांची गरज नाही, आम्ही नितेश राणेंना ती जबाबदारी दिली