सर्वोच्च न्यायालयाचा निकाल; अजित पवार म्हणाले, सरकारला धोका नाही…

संग्रहित छायाचित्र

 

लातूरः शिंदे-फडणवीस सरकार घटनबाह्य आहे, असं बोललं जातं. पण या सरकारने लोकशाही मार्गानेच अर्थसंकल्प सादर केला. हे सरकार निर्णय घेत आहे. १४५ चं बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यामुळे हे संख्याबळ असेपर्यंत या सरकारला धोका नाही, असे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.

अजित पवार हे लातूर दौऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, गेले ११ महिने हे सराकर काम करत आहे. त्यामुळे कितीही बोललं गेंल की हे सरकार घटनाबाह्य आहे. तरीही लोकशाही मार्गाने या सरकारचं काम सुरु आहे. त्यामुळे १४५ आमदारांचं पाठबळ असेपर्यंत या सरकारला धोका नाही.

गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. आता न्यायालय निकाल देणार आहे. पण मी काही कायदेतज्ज्ञांशी बोललो. त्यांचा अंदाज असा आहे की हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले जाईल. कारण हा विषय विधिमंडळाचा आहे. परिणामी विधिमंडळातच त्यावर निर्णय होईल. त्यामुळे मलाही असं वाटतंय की हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे पाठवले जाईल.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार की नाही याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. हे १६ आमदार अपात्र ठरले तर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असे कायेदतज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाकडे महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. उद्या सकाळी १०.३० नंतर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांचे घटनापीठ निकाल वाचन सुरु करेल. उद्याच्या कामकाजाचा बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. दिल्लीतील एका प्रकरणाचा निकाल घटनापीठ आधी देणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल घटनापीठ देणार आहे.

आम्ही असं नाही म्हणणार की निकाल आमच्या बाजूने लागणार आहे. हा देशाचा निकाल आहे. या देशाच्या स्वातंत्र्याचा, राज्य घटनेचा उद्या विजय होईल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे. न्यायपालिकेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. जर निकाल कायद्याला अनुसरुन आला नाही तर आपली अवस्था पाकिस्तानप्रमाणे होईल. सद्या जे पाकिस्तानात सुरु आहे. तेच आपल्याकडे सुरु होईल. पाकिस्तानात कायद्याची तोडमोड होत आहे. विरोधकांना अटक केली जात आहे. तशीच परिस्थिती भारतात निर्माण होईल, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली.