Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी पटोलेंची भूमिका आघाडीला सुरुंग लावणारी - अजित पवार

पटोलेंची भूमिका आघाडीला सुरुंग लावणारी – अजित पवार

पटोले यांची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले असून नाना पटोले यांची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केल्याची बातमी सोमवारी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली होती. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचे समजते.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीला एकप्रकारे सुरुंग लावला जात आहे. नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांची भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका मानली जाते. त्यामुळे पटोले यांची भूमिका महाविकास आघाडीला कमकुवत करणारी तसेच अडचणीत आणणारी आहे, असेही अजित पवारांनी सांगितल्याचे समजते.

- Advertisement -

तर पटोले यांनी माहितीअभावी हे आरोप केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले. राज्यात सरकार कोणाचेही असो, राजकीय पक्षांच्या सभा, मोठ्या नेत्यांचे दौरे, मंत्र्यांचे दौरे याची माहिती पोलीस यंत्रणेला ठेवावी लागते. त्यासाठी असलेली विशेष शाखा याबाबत गृहखात्याला माहिती देत असते. ही माहिती कुठल्याही पक्षाशी संबंधित असू शकते. कुणा एका पक्षाविषयी नसते. पटोलेंना हे माहीत नसेल तर त्यांच्या पक्षात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती घेतली पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून तिखट प्रतिक्रिया व्यक्त झाल्यानंतर नाना पटोले यांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा खुलासा केला आहे. ते म्हणाले, मी परवा पुण्यात होतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचे कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा अहवाल रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा अहवाल केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारकडेही जातो.सरकारकडे रोज प्रत्येक विभागाची, जिल्ह्याची माहिती जात असते. माझीच नाही तर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचीही माहिती जात असते. ही पध्दत मी कार्यकर्त्यांना सांगत होतो. ही भूमिका मी मांडली. त्याचा विपर्यास केला गेला, असे पटोले म्हणाले.

- Advertisement -

आमचा विरोध भाजपला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेशी आमचे मतभेद नाही. हे सरकार पाच वर्षे चालेल. भाजपचा सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे. त्यातूनच या कहाण्या पेरल्या जात आहेत. सरकारमध्ये कोणतीही गडबड नाही. आघाडीत नाराजी नाही, अशी सारवासारवही पटोले यांनी केली.


हेही वाचा – शरद पवार यांची साखर उद्योगातील समस्यांवर बैठक, वेतनवाढ, अर्थसहाय्य विषयांवर झाली चर्चा

 

 

- Advertisement -