आता अॅफेडिव्हेटवर लिहून देऊ का ? अजितदादा संतापले

Deputy CM Ajit Pawar

नाना पटोले यांच्या पक्ष वाढवण्याच्या निमित्ताने केलेल्या विधानाच्या निमित्ताने माझी आणि मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्याच्या बातम्या आल्या. सगळीकडे ब्रेकिंग बातमी चालवण्यात आली. पण नाना पटोलेंच्या विधानानंतर माझी आणि मुख्यमंत्र्यांची कोणतीही भेट झाली नसल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जर आमच्या दोघांमध्ये बैठक झाली असेल, तर किमान मला विचारून याबाबतचे वृत्त द्यायला हवे होते हे सांगताना अजितदादांचा पारा चढला. या विषयावर माझी प्रतिक्रिया घेणे गरजेचे होते असेही अजितदादा म्हणाले. पण चुकीच्या आणि खोट्या बातम्या दिल्या गेल्या. झोटिंग समितीचा अहवाल आमच्याकडे आलेला नाही अशीही स्पष्टोक्ती अजित पवारांनी दिली. पण झोटिंग समितीच्या अहवालावर पुन्हा प्रश्न आल्याने अजितदादा म्हणाले की, आमची कोणतीच चर्चा झालेली नाही, आता अॅफेडिव्हेटवर लिहून देऊ का ?

मी अतिशय स्पष्ट सांगणारा माणूस आहे. जर मुख्यमंत्री आणि मी भेटलो असू तर त्याबाबतची माहिती माझ्याकडून घेणे गरजेचे होते. पण ही माहिती न घेताच चुकीच्या बातम्या चालवल्या गेल्या. नाना पटोले हे महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. नाना पटोले यांनी जर पक्ष वाढवण्यासाठी काही विधाने केली असतील तर तो त्यांचा अधिकार आहे. सोनिया गांधी कॉंग्रेस पक्ष उत्तम पद्धतीने चालवत असल्याची पोचपावतीही त्यांनी यावेळी दिली. पण एखाद्या विषयाच्या चुकीच्या बातम्या चालवून अशी चर्चा घडवून आणणे ही चुकीची गोष्ट आहे.

अॅफेडिव्हिटवर लिहून देऊ का ?

झोटिंग समितीच्या अहवालाशी संबंधित सर्वच बातम्या या खोट्या आणि चुकीच्या आहेत. झोटिंग समिती अहवाल हा अद्यापही आमच्याकडे आलेला नाही. त्यामुळे अहवालाबाबतचे वृत्त हे खोटे आणि चुकीचे आहे. राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. अशावेळी झोटिंग समितीच्या खोट्या बातम्यांवरच चर्चा होताना दिसत आहे. झोटिंग समितीच्या अहवालात कोणताही ठपका ठेवण्यात आलेला नाही. तसेच झोटिंग समितीच्या अहवालाच्या बाबतीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली सभागृहातील भूमिका ही स्पष्ट आहे. त्यामुळेच अहवाल मिळालेला नसतानाच खोट्या बातम्या पसरवल्या जात असल्याचे अजितदादांनी सांगितले. झोटिंग समितीचा अहवालाच मिळालेला नाही. तरीही याबाबतच्या बातम्या आल्या. पण झोटिंग समितीचा अहवाल मिळाला का असा पुन्हा प्रश्न आल्याने अजितदादा संतापले. अहवाल नाही आला नाही, नाही असे सांगितल्यावर प्रश्न आल्याने, मग काय अॅफेडिव्हिटवर लिहून देऊ का ? असा प्रश्न अजितदादांनी यावेळी केला.