घरमहाराष्ट्र'५०० रुपये आले की, परत करा आणि भीक देताय का? असा जाब...

‘५०० रुपये आले की, परत करा आणि भीक देताय का? असा जाब विचारा’

Subscribe

मोदी सरकारच्या शेवटच्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक महिन्यात ५०० रुपये मिळणार आहेत. याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी '५०० रुपये आले की, परत करा आणि भीक देताय का? असा जाब विचारा', असे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे.

शुक्रवारी संसदेमध्ये भारताचे केंद्रिय प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये गोयल यांनी बऱ्याच योजनांची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी सम्मान योजने’ची घोषणा पियुष गोयल यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली. या योजनेअंतर्गत गरीब शेतकऱ्यांना दरमहिन्याला ५०० रुपये मिळणार आहेत. याच योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेचे नेते अजित पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ‘५०० रुपये आले की, परत करा आणि भीक देताय का? असा जाब विचारा’, असे अजित पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली निर्धार परिवर्तन यात्रा पुण्याच्या मंचर-आंबेगाव येथे येऊन पोहोचली आहे. मंचर-आंबेगाव येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये अजित पवार यांनी सरकारवर टीका केली. या जाहीर सभेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, युवा नेते रोहित पवार, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी जिल्हाध्यक्ष जालिंदर कामटे आदींसह मंचर, शिरुर,जुन्नर, खेड, आंबेगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

‘५०० रुपये आले की ते सर्व पैसे शेतकऱ्यांनी सरकारला ऑनलाईन परत पाठवा आणि आम्हाला भीक देताय का? असा जाब सरकारला विचारा’, असे आवाहन विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी मंचर येथील जाहीर सभेत केले. अजित पवार म्हणाले की, ‘आज माझा शेतकरी उध्वस्त झाला आहे. हे सरकार तुमची चेष्टा करत आहे. आमच्या शेतकर्‍याला ५०० रुपये देवून दिवसाला १६ रुपये देताय आणि साधूना ५ हजार रुपये देताय. या सरकारचा इतका उद्दामपणा, मग्रूरी, मस्ती वाढली आहे’. ‘समाजसेवक अण्णा हजारे यांना पंतप्रधान मोदींनी उपोषणाला शुभेच्छा दिल्या. अरे उपोषणाला कोण शुभेच्छा देतो का? अण्णा हजारे यांनी अनेक विषय उपोषणासाठी मांडले आहेत. परंतु त्याविषयी काही न बोलता त्यांना शुभेच्छा देता. त्यांनी तिथेच उपोषण करत बसावे का? अरे काय हा व्यवहार आहे?’, असा प्रश्न अजित पवार यांनी केला आहे.

- Advertisement -

‘त्याशिवाय आंबेगावात पाय ठेवणार नाही’

अजित पवार म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात सत्ता द्या तुमची सर्व कामे करुन देतो हा अजित पवारांचा शब्द आहे. फक्त घड्याळाचे बटण दाबून सत्ता आणा. वडीलकीच्या नात्याने पवार साहेब देशातील नेत्यांना सल्ला देत आहेत. सगळ्या पक्षांना एकत्र करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी खासदार निवडून द्या आणि पवार साहेबांचा हात मजबुत करा. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा एकमेव नेता शरद पवार आहेत’. त्याचबरोबर ‘पुणे जिल्हा आणि शहरातील वाहतूक कोंडी विषयी अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आणि हे रस्ते सत्ता आल्यावर चांगल्या पद्धतीने करुन देतो हा शब्द आहे. त्याशिवाय आंबेगावात पाय ठेवणार नाही’, असे अजित पवार म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -