शरद पवारांनी सर्व जातीधर्मीयांना नेतृत्वाची संधी दिली अन् हा पठ्ठ्या म्हणतो…, अजित पवारांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर

ajit pawar slams raj thackeray criticism on sharad pawar over The politics of racism

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात शिवतीर्थावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांनी जातीपातीचे राजकारण केलं खरं तर राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यात जातीयवाद वाढला असल्याचे टीकास्त्र राज ठाकरेंनी डागले. राज ठाकरेंच्या टीकेनंतर राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शरद पवार यांच्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार यांनी सर्व जाती धर्मातील लोकांना नेतृत्व करण्याची संधी दिली आणि हा पठ्ठ्या म्हणतो शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण केलं अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना सुनावले आहे. पवारांचे राजकारण पाहिले तर कुठेही जातीयवाद राजकारण दिसणार नाही असे अजित पवार म्हणाले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापुरात शेतकरी मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी अजित पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज ठाकरेंनी शरद पवारांचे नाव घेत पवारांचे राजकारण जातीयवादी असल्याचे आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादी नेते नवाब मलिक आणि छगन भुजबळ यांच्यावरसुद्धा ठाकरेंनी निशाणा साधला होता. अजित पवारांकडून यावर प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी राजकारण करत असताना सर्व धर्म समभाव सांभाळला. सगळ्या जातीधर्मातील लोकांना पवारांनी नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. हा पठ्ठ्या म्हणतो जातीपातीचं राजकारण केलं, काय बोलावं आता अशा शब्दात अजित पवारांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

अजित पवार पुढे म्हणाले की, कोणीही सांगावे की शरद पवार यांनी जातीपातीचे राजकारण केलं, शरद पवारांचे पहिल्यापासून ते आतापर्यंतचे निर्णय काढून बघा, त्यात कोणीही दाखवावे, त्यांनी जातीपातीचे राजकारण केलं, प्रत्येक वेळी शरद पवार यांनी सर्व धर्म समभाव हीच भूमिका ठेवत मार्गक्रमण केलं आहे. पवारांभोवती राजकारण फिरत असल्यामुळे टीका करण्यात येते असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंची शरद पवारांवर टीका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. शरद पवार यांच्यामुळे महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु झाले. हेच राजकारण शरद पवारांना अपेक्षित असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.


हेही वाचा : Raj Thackerayच्या टीकेवर शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘एखादं व्याख्यान देऊन पुन्हा ३-४ महिने गायब’