भाई केशवराव धोंडगे म्हणजे सामान्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडणारे मन्याडचे वाघ – अजित पवार

ajit pawar

मुंबई – भाईंच्या भाषणात शब्दांच्या कोट्यांची भरमार असायची… औचित्याचा मुद्दा… तारांकित प्रश्न… लक्षवेधी ही सारी संसदीय आयुधे वापरुन त्यांनी सरकारला जेरीस आणण्याचे काम केले. सामान्य लोकांचे प्रश्न सभागृहात पोटतिडकीने मांडणारे ते ‘मन्याड’ चे वाघ होते अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाई केशवराव धोंडगे यांचा सभागृहात गौरव केला.

महाराष्ट्र विधीमंडळाचे अधिवेशन गाजवणारे व्यक्तिमत्व म्हणून भाई केशवराव धोंडगे हे आमच्यासारख्या अनेक पिढ्यांच्या लक्षात आहेत. संसदीय आयुधांचा प्रभावी वापर करुन लोकांना न्याय कसा मिळवून देता येतो, याचे ते आदर्श उदाहरण आहेत. विधिमंडळात त्यांनी केलेली भाषणे हा विधीमंडळ कामकाजाचा अमूल्य ठेवा आहे असेही अजित पवार म्हणाले.

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी माजी आमदार भाई केशवराव धोंडगे यांच्या वयाच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांच्या संसदीय व सामाजिक कार्याचा विधीमंडळातील गौरवपर प्रस्तावावर विरोधी पक्षनेते अजित पवार बोलत होते. महाराष्ट्राचे विधीमंडळ आपल्या बुद्धीचातुर्याने, वक्तृत्व कौशल्याने गाजवणारे, सभागृहातल्या भाषणांमध्ये शैलीदार कोटी करुन भल्याभल्यांची भंबेरी उडविणारे नेते म्हणून भाई केशवराव धोंडगे यांची आमच्या पिढीला खास ओळख आहे. देशातील आणीबाणीसंदर्भात आचार्य विनोबा भावेंनी केलेल्या एका वक्तव्यानंतर, आचार्यांना पत्र लिहून टोकदार भाषेत नापसंती व्यक्त करणारे सुध्दा एकमेव तेच असावेत असे सांगितले.

औरंगाबादला आकाशवाणी केंद्र व्हावे, औरंगाबादला उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, परभणीत कृषी विद्यापीठ व्हावे अशा अनेक मागण्यांसाठी त्यांनी केलेला पाठपुरावा वाखणण्यासारखा होता. सभागृहात संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी त्यावेळच्या सरकारला बॅकफुटवर जायला भाग पाडले होते. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाणसाहेब आणि भाई केशवराव धोंडगेंचे मतभेद होते. परंतु, लोकसभेच्या निवडणुकीत अशोकराव चव्हाण साहेबांच्या पराभवानंतर त्यांना मनापासून दु:ख झाले होते. अशोकरावांचे जाहीर कौतुक करण्याचा मनाचा मोठेपणा भाईंनी दाखविला आहे असेही अजित पवार म्हणाले.

भाई केशवराव धोंडगे यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते आईचे मोठेपण, आईचे गुरुपण आणि ऋण सर्वोच्च मानून भाईं ‘माय-पौर्णिमा’ साजरी करतात. ‘माय म्हणजे आई, ती सगळ्यांची गुरू. जर पौर्णिमाच साजरी करायची असेल तर ‘माय-पौर्णिमा’ म्हणून साजरी करायला हवी, या त्यांच्या विचाराबद्दल आपणही चिंतन केले पाहिजे. भाईंनी वयाचे शतक पार केले असले तरी त्यांच्या व्यक्तिमत्वातला रुबाब, आवेश, कणखरपणा आजही कायम आहे. अजब रसायनाने भरलेले व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख त्यांनी आजही कायम राखली आहे अशा शब्दात अजित पवार यांनी कौतुक केले.

बोलण्यातले रांगडेपणा… लोकांमध्ये थेट मिसळण्याची वृत्ती… सत्य-न्यायासाठी काहीही करायची तयारी… पांढराशुभ्र पोषाख… विशिष्ट पध्दतीने घातलेले धोतर ही त्यांची ओळख… वयानुसार थोडा बदल झाला असला तरी, आजही कायम आहे. भाई केशवराव धोंडगेंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू म्हणजे विविध विषयांवर जाहीर वादविवाद करणे. नांदेड जिल्ह्यातील दुष्काळी, डोंगराळ कंधार विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा आमदार व नांदेड लोकसभा मतदारसंघातून एकदा खासदार म्हणून त्यांनी संसदीय कारकीर्द गाजविली आहे. त्यांची विधानसभेतील भाषणे सरकारवर आग ओकणारी होती. इरसाल म्हणींचा वापर करत ते सरकारला सळो की, पळो करून सोडत. हा लोकनेता विद्वान असल्याची प्रचिती त्यांच्या ४० पुस्तकांवरून येते असेही अजित पवार म्हणाले.

सन १९७२चा दुष्काळ, रोजगार हमी योजना, कंधार येथे एमआयडीसीची स्थापना, शिक्षण संस्थांची स्थापना, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात भालकी सत्याग्रह, गुराखी मुक्ती परिषद व गुराखी साहित्य संमेलन, दमकोंडी सत्याग्रह, ‘साप्ताहिक जयक्रांती’, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी यशस्वी करुन दाखवल्या. वयाची १०० वर्षे पूर्ण केल्यानंतर, जगभरात साम्यवादाबद्दल चिंता व्यक्त असताना, आदरणीय भाई आजही, जगाला साम्यवाद, मार्क्सवाद, गांधीवादी विचाराची गरज आहे. आता शरीर थकले; पण माझा विचार कधी थकणार नाही, असे सांगतात, तेव्हा त्यांच्याबद्दलचा आदर निश्चितच वाढतो, असे गौरवोद्गार काढत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाई केशवराव धोंडगे यांना शतकपूर्तीनिमित्त शुभेच्छा दिल्या.


हेही वाचा : केजरीवालांकडून गडकरींच्या नावे आमदारांना फोन, योगेंद्र यादवांचा मोठा खुलासा