विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश, पवारसाहेबांची भूमिका निर्णायक; अजित पवारांची प्रतिक्रिया

ajit pawar

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक स्वरुपात सन २०२५ पासून लागू करण्याचे जाहीर करुन विद्यार्थ्यांसमोरचा संभ्रम दूर केला आहे. ‘एमपीएससी’च्या या निर्णयाचे स्वागत करत असून गेल्या काही दिवसांपासून राज्यभर सुरु असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवारसाहेबांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली होती, ती निर्णायक ठरली, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

नवीन अभ्यासक्रम सन २०२५ पासून सुरु करण्याच्या या निर्णयामुळे उमेदवारांना नवीन स्वरुपातल्या अभ्यासक्रमावर आधारीत परिक्षेची तयारी करण्यासाठी आवश्यक कालावधी उपलब्ध होणार आहे. या नवीन स्वरुपाच्या अभ्यासक्रमामुळे राज्य शासनाच्या सेवेत दर्जेदार अधिकारी उपलब्ध होतील, असं अजित पवार म्हणाले.

एमपीएससीच्या या निर्णयाबद्दल विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतानाच आता विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करुन घवघवीत यश मिळवावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश – शरद पवार

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : तुम्ही केलेल्या संघर्षाला यश.., एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या शुभेच्छा