‘उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल’; अजित पवारांचा निशाणा

आग्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही.

sharad pawar reaction karnataka government over attack on maharashtra vehicles over border dispute

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मागील काही दिवसांपासून राजकीय नेते आक्षेपार्ह विधान करत आहेत. अशातच राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा शिवरायांबद्दल बोलणाऱ्यांना चांगलाच टोला लगावला आहे. ‘या’ उदाहरणाची आणि ‘त्या’ उदाहरणाची तुलनाच होऊ शकत नाही. उगाच काहीतरी उचलली जीभ लावली टाळ्याला असं कसं चालेल. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहे त्यामुळे हे आम्ही सहन करणार नाही असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आग्रात ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवले त्याची आणि शिंदेच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही. यांना कुणी बंदी केले होते असा सवाल करतानाच एकनाथ शिंदे सभागृहात गटनेते होते. २०१४ मध्ये त्यांना विरोधी पक्षनेते पद दिले होते. त्यांच्यावरच सगळी जबाबदारी होती हेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक झाली. या बैठकीत संघटनात्मक चर्चा आणि नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी या तीन गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून अधिवेशनात काम करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली असेही अजित पवार म्हणाले.

याशिवाय हल्ली घडणाऱ्या घटना आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची वक्तव्ये, सीमावाद प्रकरण, पीकविमा यावरही चर्चा झाली. या सगळ्या गोष्टींचा शरद पवार यांना अनुभव असल्याने त्यांनी यावर मार्गदर्शन केले. ६ डिसेंबर रोजी प्रदेश कार्यकारिणीची बैठक मुंबईत होणार असून या बैठकीमध्ये शेतकरी दिंडीबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असेही अजित पवार यांनी सांगितले.


हे ही वाचा – मी हातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचं आहे ते करणारच, उदयनराजेंचा इशारा