पुणे : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात काका वि. पुतणा अशी लढत झाल्याचे पाहायला मिळाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र पवार याच्याविरोधात निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत त्यांचा लाखोंच्या फरकाने पराभव झाला. ज्याबाबत आता अजित पवारांनी मोठे भाष्य करत मोठ्या भावावर टीका केली आहे. मी माझ्या भावाला तुझ्या मुलाला माझ्याविरोधात उभे करू नकोस असे सांगितले असल्याचे अजित पवारांकडून सांगण्यात आले. (Ajit Pawar taunts his brother over the issue of Baramati assembly elections)
बारामती विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, माझ्या भागात आमचा लोकसभेचा उमेदवार 48 हजारांनी पडला. मी माझ्या भावाला निरोप पाठवला, अरे नको माझ्याविरोधात तुझ्या पोराला उभे करू. पण त्याने म्हटले की, अरे नाही, बारामती साहेबांच्या मागे आहे, असे मला सांगितले. मात्र, मी म्हटले की, आहे, मी कुठे नाही म्हणतोय. पण, शरद पवारांचा नंबर झाल्यावर बारामती माझ्यामागे आहे. म्हणून मला लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिले. मी आपला गप्प बसलो. सगळं खानदान माझ्याविरोधात प्रचार करत होते. पण मी शांत राहिलो, असे म्हणत त्यांनी भाऊ श्रीनिवास पवार यांना टोला लगावला.
हेही वाचा… Sunil Tatkare : एकत्रितपणा किती क्षणासाठी आहे हे दिसतंय; राऊतांच्या विधानावर तटकरेंची प्रतिक्रिया
तसेच, लोकसभेला जागा कमी आल्या त्यामुळे विधानसभेला 25 टक्के जागा घेतल्या अधाशासारख्या जागा मगितल्या नाहीत. सध्या आमचे चांगले सुरूय… सरकारला दृष्ट लावू नये, म्हणून देवगिरीवर काळी बाहुलीच बांधतो, असे त्यांनी म्हटल्यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. परंतु, शरद पवारांनंतर बारामती माझ्यामागे उभी असल्याच्या विधानानंतर आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, लोकसभेत अजित पवारांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून निवडणूक लढली होती. ती निवडणूक नणंद-भावजय यांच्यामध्ये झाल्याने त्याची वेगळीच रंगत पाहायला मिळाली. पण त्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ज्यानंतर विधानसभेत अजित पवारांचा पराभव होणार असे म्हटले जात होते. पण यावेळी मात्र, अजित पवार एक लाखपेक्षा अधिक मतांच्या फरकाने निवडून आले.