अजित पवार राज्याचे भावी मुख्यमंत्री? फडणवीस म्हणतात, कधी तरी…

ajit pawar and devendra fadnavis

पुणे – राज्याचा भावी मुख्यमंत्री कोण यावर गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री असं लिहित बॅनरबाजी करण्यात आली होती. आता अशीच बॅनरबाजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याबाबत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालयाबाहेर अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये भावी मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. दरम्यान, या सर्व प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक टीप्पणी केली आहे.

अजित पवारांची भावी मुख्यमंत्री अशी बॅनरबाजी करण्यात आल्याने याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले की, भावी म्हटलंय ना.. कधीतरी त्यांचं राज्य येईल.. येऊ शकतं कधीतरी ते येऊ शकतात, असं फडणवीस म्हणाले. अर्थात त्यांच्या प्रतिक्रियेमागे मिश्किल आणि खोचकपणा होता.

हेही वाचा – ‘भावी मुख्यमंत्री जयंत पाटील’, समर्थकांकडून मुंबईत बॅनरबाजी; राजकीय वर्तुळात चर्चा

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्युलानुसार राष्ट्रवादीकडे पुढचे मुख्यमंत्री पद येणार होते. परंतु, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केल्याने महायुतीचं सरकार स्थापन झालं. यामुळे अजित पवार उपमुख्यमंत्री पदावर पायउतार झाले. त्यामुळे राष्ट्रवादीचं मुख्यमंत्रीपदही हुकलं. दरम्यान, आता विधानसभेच्या निवडणुका येत्या दोन ते अडीच वर्षांत लागतील. यावेळी महाविकास आघाडी अधिक जोमाने निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. यावेळी राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्री पदासाठी अनेकांची नावं शर्यतीत आहेत. त्याकरता अजित पवार, जयंत पाटलांचा क्रमांक अनुक्रमे लागतो. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते कामाला लागले असून दोघांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे.

जयंत पाटलांसाठीही लागला होता बॅनर

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा उद्या १६ फेब्रुवारी रोजी वाढदिवस होता. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईतील घरातील परिसराजवळ समर्थकांनी बॅनरबाजी करण्यात आली होती. बॅनरबाजी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं.