घरताज्या घडामोडीकेंद्राने महाराष्ट्राला मदत करण्यात सहभाग घेतला नाही - बाळासाहेब थोरात

केंद्राने महाराष्ट्राला मदत करण्यात सहभाग घेतला नाही – बाळासाहेब थोरात

Subscribe

राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्कफोर्सच्या माध्यमातून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच टास्क फोर्सच्या निर्णयानंतर राज्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल. राज्यातल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संकटामध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी अतिशय महत्वपूर्ण आहे. संपुर्ण परिस्थिती हाताळण्यासाठी आरोग्य विभागाचा संबंध जास्त आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी काय करता येईल यासाठीच राज्य सरकारच्या पातळीवर विचारमंथन सुरू आहे. राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय समाजातील घटकांसोबत बोलण करूनच याबाबतचा निर्णय घेतील, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या मदतीसाठी केंद्राने आतापर्यंत कोणताच सहभाग घेतला नाही, ही गोष्ट दुर्दैवी असल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी केंद्राच्या भूमिकेवर टीका केली.

राज्यातल्या बहुतांश अशा सर्वसामान्यांचे हातावरचे पोट असते. त्यामुळे त्यांना अशा संकटाच्या काळात काही तरी आर्थिक आधार हा मिळणे गरजेचे आहे. या घटकाची जबाबदारी शासनावर आहे. अशा घटकाला काही मदत करताना ती कोणत्या पद्धतीने करता येईल या सगळ्या प्रक्रियेसाठी वेळ लागत आहे. त्यामुळेच राज्य सरकार या घटकाच्या बाबतीत काही तरी नक्कीच निर्णय घेईल. सध्या राज्यात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. कोरोनाची सद्यस्थिती आहे ती पाहता लॉकडाऊन करणे गरजेचे आहे. संसर्ग कमी करण्यासाठी लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पण लॉकडाऊनचा निर्णय हा मुख्यमंत्री घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या टास्क फोर्सकडून लवकरच याबाबतची घोषणा होईल. मुख्यमंत्री याबाबतचा लवकरच निर्णय जाहीर करतील असेही ते म्हणाले. दहा लाख जणांची जेवणाची व्यवस्था महाराष्ट्राने केली. परप्रांतीयांना बाहेर जाण्याची व्यवस्था महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम अशी केली. राज्यासाठी मदत करायला जसा केंद्राने सहभाग घ्यायला हवा होता, तो सहभाग केंद्राकडून घेतला गेला नाही. केंद्राने काय आर्थिक पॅकेज दिले आम्हाला माहिती नाही. पण महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राने सहभाग घेतला नाही, ही दुर्दैवी स्थिती आहे, असेही थोरात म्हणाले.

- Advertisement -

दहावी आणि बारावी परीक्षांचा निर्णय हा येत्या २ दिवसांमध्ये करण्यात येईल. सध्या लागोपाठ आलेल्या सुट्ट्यांमुळे हा निर्णय लांबलेला आहे. पण लवकरच हा निर्णय घेण्यात येईल. राज्यात लॉकडाऊनबाबतचा निर्णय हा कटू असेल पण हा निर्णय घेण्याची वेळ सरकारवर आली आहे. कोरोनाच्या संकट हे आधीच्या संकटापेक्षा अधिक तीव्र आहे. त्यामुळेच काही उपाययोजना करण्यासाठीच राज्य सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असे थोरात यांनी स्पष्ट केले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -