पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे रागीट स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ते कधी काय बोलतील याचा काही नेम नाही. जाहीर कार्यक्रम असो, कार्यकर्त्यांचा मेळावा असो किंवा एखादी पत्रकार परिषद असो, अजित पवारांना राग आला तर ते कधी कोणाला काय बोलतील हे सांगता येत नाही. मात्र ते त्यांच्या मिश्किल टिप्पणीसाठीही ओळखले जातात. अजित पवारांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. पुण्यातील एका कार्यक्रमाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली होती. यावेळी दोघांनी हातात एके-47 रायफल घेऊन अनेकांवर निशाणा साधला आहे. अशातच अजित पवार यांनी महायुतीच्या चांगल्या बातम्या नाहीतर एकेकाला आम्ही दोघे उडवून टाकू असा इशारा दिला. (Ajit Pawar tough statement while holding an AK-47)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात विविध प्रकल्पांचे उद्घाटन केले. याचवेळी त्यांनी चाकण येथील औद्योगिक वसाहतीमधील निबे लिमिटेड मिसाईल्स कॉम्प्लेक्स अँड प्रिसिजन मशीनिंगच्या अत्याधुनिक मिसाईल्स अँड स्मॉल आर्म्स कॉम्प्लेक्सचेही उद्घाटन केले. याच कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी हातात एके-47 रायफल घेत अनेकांवर निशाणा साधला. याचवेळी अजित पवार यांनी आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू असे सुरुवातीला म्हटले. यानंतर त्यांनी पत्रकार आणि माध्यमांच्या कॅमेरांवर बंदूक रोखत मिश्किलपणे महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या नाहीतर उडवून टाकू, असे विधान केले. अजित पवारांच्या या वक्तव्याने तिथे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांनाच हसू अनावर झाले. यानंतर अजित पवार यांनी ‘आता हे पत्रकार एवढंच छापणार’ असा टोलाही लगावला.
हेही वाचा – ST Corporation Chairmanship : फडणवीसांचा शिंदेंना धक्का, सरनाईकांकडून एसटीचं स्टिअरिंग हिसकावलं
शिट्टी वाजवणाऱ्यांनाही अजित पवारांनी भरला दम
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांलयाच्या इमारतीचे भूमिपूजन पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांचा सन्मान केला जात असतानाच तिथे उपस्थित काही तरुणांनी शिट्ट्या वाजवल्या. त्यामुळे अजित पवार संतापले आणि त्यांनी माइक हातात घेत पोलिसांचा कार्यक्रम सुरू असताना काय चालले आहे. शिट्ट्या कशाला वाजवता, शिट्ट्या वाजऊ नका, मुख्यमंत्री याठिकाणी आले आहेत. शिस्त आहे की नाही? आता शिट्ट्या वाजवल्या तर पोलिसांना उचलायला सांगेन, असा थेट इशाराच त्यांनी दिला.
हेही वाचा – Chhagan Bhujbal : अजित पवारांनी मला फोन केला, भुजबळांनी सांगितले दोघांमध्ये काय झाला संवाद?