मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्हावर सुनावणी सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे प्रत्यक्ष नाव न घेता, जोरदार टीका केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमधील वाद आणखी चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे निष्ठावान म्हणून ओळखले जाणारे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत, कर्तृत्व सिद्ध करण्याचे आवाहन दिले आहे.
हेही वाचा – Yuva Sangharsh Yatra : आदरणीय अजितदादा…, संघर्ष यात्रेवरील टीकेला रोहित पवारांचे प्रत्युत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे मंथन शिबिर कर्जत येथे झाले. त्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांचा थेट उल्लेख टाळला. ‘वरिष्ठां’नी सातत्याने आम्हाला गाफिल ठेवले, अशी टीका त्यांनी शरद पवार यांच्यावर केली. वारंवार शब्द द्यायचा आणि माघारी फिरायचे, असे वरिष्ठ का करत होते? असा सवालही त्यांनी केला आहे. तर, बात करने से पहले खुद के गिरेबान में झांक के देखो, असे प्रत्युत्तर राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्यु्त्तर दिले आहे.
दादा, तुम्ही महाराष्ट्राला कायम स्वत:ची ओळख करुन देताना म्हणत आलात की, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, प्रसंगी वाटेल ती किमंत मोजावी लागली तरी ! शिवसेना फुटल्यानंतर केलेल्या भाषणांत आजचे मुख्यमंत्री ज्यांच्या मंत्री मंडळात आपण उपमुख्यमंत्री आहात त्यांना दिलेला हा सल्ला होता. या… pic.twitter.com/vHy81ZJuUp
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 1, 2023
शिवाय, राष्ट्रवादी पक्षावर केलेल्या दाव्यासंदर्भातही त्यांनी अजित पवार यांचा एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. शिंदे गटाने शिवसेनेवर दावा केल्यानंतर अजित पवार यांनी व्यक्त केलेला संताप या व्हिडीओत दिसत आहे. ज्यांच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला आणि वाढवला, त्यांचाच पक्ष आणि चिन्ह काढून घेतले. हे जनतेला पटले आहे का, याचा विचार झाला पाहिजे. तुमच्यात धमक होती तर, काढा ना पक्ष! तुम्हाला कोणी अडवले आहे? असा सवाल ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारताना दिसत आहेत.
हेही वाचा – Ajit Pawar ‘या’ कारणामुळे संभाजीनगरचा दौरा केला रद्द; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
याच अनुषंगाने डॉ. जितेंद्र आव्हाड म्हणतात, प्रसंगी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी, मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे, असे अजित पवार कायम महाराष्ट्राला स्वत:ची ओळख करून देताना म्हणत आले आहेत. शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी केलेल्या भाषणात, ज्यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री आहेत, त्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला हा सल्ला आहे. या सल्ल्याप्रमाणे अजित पवार वागले तर महाराष्ट्रात त्यांचे कौतुक होईल, असा टोला आव्हाड यांनी लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जन्म शरद पावर यांनी दिला, त्याचे पालनपोषण, संगोपनही पवार यांनीच केले. राष्ट्रवादी पक्ष वाढला हा देखील पवार यांच्यामुळेच आणि तो फक्त महाराष्ट्रातच नाही तर, पूर्ण देशभरात. मग, जसे आपण म्हणाला होता, तसा एक नवीन पक्ष काढा, नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तृत्व सिद्ध करून दाखवा, असे आवाहनच त्यांनी अजित पवार यांना दिले आहे.