घर महाराष्ट्र Ajit Pawar यांना डावललं? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

Ajit Pawar यांना डावललं? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले स्पष्टीकरण

Subscribe

शरद पवारांनी स्वतः या नव्या जबाबदारींची घोषणा केली आहे. यात अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. या संबंधी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज भाकरी फिरवण्याचे काम शरद पवारांनी दिल्लीत केले आहे. पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभात राष्ट्रवादी काँग्रसेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तर, दुसरा मोठा निर्णय खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्तीसोबतच त्यांच्यावर महाराष्ट्रातील निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. शरद पवारांनी स्वतः या नव्या जबाबदारींची घोषणा केली आहे. यात अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. या संबंधी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा – Big News : शरद पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

- Advertisement -

जयंत पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राच्या विरोधी पक्ष नेतेपदाची मोठी जबाबदारी आहे. दादा नाराज नाहीत. आमच्या पक्षासाठी आज आनंदाचा दिवस आहे. पक्षामध्ये अनेक नेत्यांवर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. यात अजित पवार कुठेही नाराज नाहीत.’

शरद पवारांनी त्यांच्या भाषणाच्या शेवटी पक्षात कार्यकारी अध्यक्ष पदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे, राष्ट्रीय सरचिटणीस पदी सुनिल तटकरे यांची नियुक्ती जाहीर केली. त्यासोबतच जितेंद्र आव्हाड यांनाही ओबीसी विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये पक्ष विस्ताराची जबाबदारीही काही नेत्यांवर देण्यात आली आहे. त्यातही अजित पवार यांचे नाव कुठेही नाही. यामुळे अजित पवार नाराज आहेत का, असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावर जयंत पाटील यांनी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्हाला आमच्या पक्षातील आनंद दिसतच नाही का? अजित पवार हे कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्या समोरच या निर्णयांची घोषणा झाली आहे, त्यामुळे ते नाराज नाहीत.

- Advertisement -

मागील महिन्यात 2 मे या दिवशी राज्यात शरद पवार यांनी ‘लोक माझा सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दरम्यान अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. त्यानंतर पक्षाच्या सर्वच नेत्यांनी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती केली. यावेळी राज्यातील जनतेला मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्हाय. बी. चव्हाण सेंटरसमोर आंदोलन केले. यावेळी तर काही कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने लिहिलेले पत्र शरद पवारांना देत त्यांनी घेतलेला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर पवारांनी दोन ते तीन दिवसांनी आपला राजीनामा मागे घेत अध्यक्ष पदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासूनच शरद पवार हे नक्की भाकरी फिरवणार अशी चर्चा करण्यात येत. ती भाकरी आज पवारांनी फिरवली आहे. पण त्या भाकरीचा एक तुकडा देखील अजित पवारांच्या ताटात टाकला नसल्याचे आज पाहायला मिळाले आहे.

- Advertisment -