Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र Nitesh Rane on Ajit Pawar : 'टिल्ल्या' म्हणून हिणवणारे अजित पवार हे...

Nitesh Rane on Ajit Pawar : ‘टिल्ल्या’ म्हणून हिणवणारे अजित पवार हे नितेश राणेंसाठी ‘करमुक्त’!

Subscribe

मुंबई : ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट आणि भाजपा असा सामना रोज रंगत आहे. महाविकास आघाडीची सोमवारी वांद्रे कुर्ला संकूलात झालेल्या सभेत भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले. त्याला भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आज, मंगळवारी सकाळी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. तथापि, विरोधी पक्षनेते अजित पवार (Leader of Opposition Ajit Pawar) हे ‘करमुक्त’ असल्याचे सांगत त्यांच्याबाबत टिप्पणी करण्याचे आमदार नितेश राणे यांनी टाळले.

दस्तुरखुद्द बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले शिवसेनेचे (उबाठा) फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे 2019पासूनच राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आहेत. शिंदे गट शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंतर उद्भवलेल्या सत्ता संघर्षापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून ही मुलूखमैदानी तोफ धडधडत आहे. रोज सकाळी माध्यमांना रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया देताना आपल्या तिखटजहाळ भाषेत टीका करून संजय राऊत भाजपासोबतच शिंदे गटातील नेत्यांनाही अक्षरश: जेरीस आणत आहेत. राऊतांच्या आक्रमणाला थोपवण्यासाठी त्यांच्या प्रत्येक टीकेला एकत्रितपणे प्रत्युत्तर देण्याची स्ट्रॅटेजी भाजप-शिवसेनेने आखली आहे. त्यानुसार भाजपा आणि शिंदे गटातील नेत्यांना संजय राऊतांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देण्याचे आदेशच वरिष्ठांकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार संजय राऊत यांची सकाळची पत्रकार परिषद झाल्यानंतर लगेचच भाजपा आमदार नितेश राणे यांची पत्रकार परिषद होते.

- Advertisement -

आज, मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवारांवर टीका करताना, त्यांनी कोणतीही टिप्पणी करण्याचे टाळले. वस्तुत: हिवाळी अधिवेशनानंतर अजित पवार यांनी नितेश राणे यांचा ‘टिल्लू’ असा उल्लेख केला होता. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात, छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नाहीत तर, ‘स्वराज्यरक्षक’ आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. त्यावरून नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया विचारली असता, टिल्लू लोकांनी आम्हाला सांगू नये. त्यांची उंची किती त्यांची झेप किती त्यांना मी कशाला उत्तर देऊ. असल्या लोकांच्या मी नादी लागत नाही, असे अजित पवार म्हणाले होते. तर, सोमवारी अजितदादांनी प्रत्यक्ष कोणाचे नाव न घेता, ‘अलीकडच्या काळात वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. टिल्ली टिल्ली लोकं सुद्धा काहीपण बोलायला लागली आहेत. आपण काय बोलतोय काय नाही… यांचे अनेक शब्द मीडियाला दाखवताही येत नाही,’ अशी टीका केली होती.

तर, त्याला प्रत्युत्तर नितेश राणे देतील असे अपेक्षित होते. मात्र, नितेश राणे यांनी, काल उद्धव ठाकरे आणि अजित दादांनी माझ्या पत्रकार परिषदांचा उल्लेख केला. तसे म्हटले तर अजितदादांना सगळेच माफ आहे. ते करमुक्त आहेत. म्हणून त्यांच्यावर मी काही टीका करणार नाही, असे सांगून हा विषय संपविला. त्यामुळे भाजपाच्या रडारवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हेच आहेत का, अशी चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

अजित पवारांबाबत भाजपाचा सॉफ्ट कॉर्नर?
अजित पवार नॉट-रिचेबल झाले की, लगेचच विविध तर्कवितर्क मांडले जातात. मध्यंतरी ते भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. पण नंतर त्यांनी ‘जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार’ असल्याचे माध्यमांसमोर स्पष्ट केले. मात्र, अद्यापही ती कुजबूज सुरूच आहे. त्यातच आता नितेश राणे यांनी अजितदादांना सर्व माफ असल्याचे सांगितल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -