बारामती : एरवी एकहाती जिंकला जाणारा बारामती लोकसभा मतदारसंघ काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सुप्रिया सुळेंविरोधात इथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. इतके दिवस याच्या केवळ चर्चाच होत्या, आता येथील चित्र स्पष्ट झाल्याचे दिसते आहे. सुनेत्रा पवार यांचे बारामती मतदारसंघातील दौरे वाढले आहेत. बारामतीकरांशी त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. शुक्रवारी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघीही बारामती दौऱ्यावर आहेत.
हेही वाचा – 12 IAS Transfers : बदल्यांचा धडका; सिंघल सिडकोत, गुप्तांकडे फायनान्स तर राजेश कुमार महसूलमध्ये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या शुक्रवारी बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध ठिकाणी सुनेत्रा पवार विविध विकास कामांचा शुभारंभ करणार असून गाठीभेटी घेणार आहेत. बारामतीतील सूर्यनगरी परिसरात सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रस्त्याचे भूमिपूजन झाले. काही दिवसापासून बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवारांचे दौरे वाढले आहेत. विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघासाठी त्यांच्या नावाची चर्चा असतानाच त्यांचे दौरे पाहता आगामी काळात नणंद-भावजयीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
…आता लोकांना वारंवार भेटावे लागेल
सुनेत्रा पवार या सातत्याने बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा करत आहे. दरम्यान, गुरुवार, 22 फेब्रुवारी रोजी अखिल बारामती लोहार समाज श्री विश्वकर्मा जयंती उत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून सुनेत्रा पवार या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी एक सूचक वक्तव्य केले. “मी भिगवणमध्ये पहिल्यांदा आले आहे. प्रचाराच्या निमित्ताने मी कधी भिगवणमध्ये आले नव्हते, पण आता भिगवणमधील लोकांच्या भेटी वारंवार घ्याव्या लागतील” असं सुनेत्रा पवार म्हणताच एकच हशा पिकला.
हेही वाचा – Ajit Pawar : दादांची दादागिरी; म्हणाले- संभाजीनगरमधील अधिकाऱ्यांना मस्ती आली का?
सुप्रिया सुळे देखील बारामतीत…
बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी आणि पर्यायाने पवार कुटुंबियांच्या ताब्यात आहेत. शरद पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीचे नेतृत्व सुप्रिया सुळे आणि अजित पवारांकडे असल्याचे पाहायला मिळाले. मात्र, आता राष्ट्रवादीत शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. त्यात आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी देखील कंबर कसली आहे. सुप्रिया सुळे या देखील बारामतीचा दौरा करत आहेत.