अजित पवार सहशिवसेनाप्रमुख होणार, फडणवीसांच्या वक्तव्याने शिंदेंही चकीत, नेमकं काय घडलं?

eknath shinde, devendra fadnavis

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस विविध मुद्द्यांवरून गाजतोय. विरोधी पक्ष, सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आगपाखड केली. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उत्तर दिलं. यावेळी त्यांनी तुफान फटकेबाजी केली. विरोधकांवर टीका करताना त्यांच्यातील राजकीय स्टॅणडअप कॉमेडिअनही समोर आला. खासकरून त्यांनी आज विरोधी पक्षनेते अजित पवारांना टार्गेट केलं. यावरूनच देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना सहशिवसेनाप्रमुख म्हणून संबोधलं. मात्र, त्यांचं हेच वाक्य घेरत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा हशा पिकवला.

अजित पवार ठाकरे गटाची सक्षम बाजू घेताना दिसत आहेत. यावरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना कोपरखळी दिली. तेवढ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ते आता सहशिवसेनाप्रमुख बनतील. तेवढ्यात एकनाथ शिंदेनीही त्यांना अनुमोदन दिलं. मात्र, शिवसेना आता आपल्या ताब्यात आल्याचं लागलीच शिंदेंना लक्षात आलं. त्यामुळे शिवसेना आता आपल्या ताब्यात आलीय, त्यामुळे अजित पवार सहशिवसेनाप्रमुख बनू शकत नाहीत, असं म्हणाले. त्यामुळे सभागृहात पुन्हा खळखळाट झाला.

दरम्यान, राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चेवर उत्तर देत आहेत. उत्तराच्या सुरुवातीपासूनच त्यांनी हसत खेळत वातावरणात विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. अजित पवार, जयंत पाटलांसह संपूर्ण महाविकास आघाडीविरोधात त्यांनी मिश्किल टीप्पणी केली. पहाटेचा शपथविधीसह घटनाबाह्य विरोधी पक्षनेते, चहापान, जाहिरातीवरील खर्चांवर त्यांनी भाष्य केलं.