‘भारत श्री’ विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन

प्रकाशन सोहळ्याचे माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजन...

मुंबई – महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी २९ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता या प्रकाशन सोहळ्याचे माझगाव येथील सर एली कदुरी शाळेच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे.

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण यांनी हे खेळचरित्र लिहिले असून सदामंगल पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डोंगरी-उमरखाडीच्या मातीत कबड्डीचे हुंकार घुमवत असतानाचा शरीरसौष्ठव खेळातही विजू पेणकर यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. १९७० च्या दशकात आपल्या खेळाने विजू पेणकर यांनी कबड्डीवर अधिराज्य गाजवले. कबड्डीसोबतच १९७२ साली बॉडीबिल्डगमधील सर्वोच्च असा ‘भारत श्री’ किताबही विजू पेणकर यांनी पटकावला. त्यांच्या याच कामगिरीच्या जोरावर १९७२ साली बोर्नव्हिटाच्या जाहिरातीसाठी त्यांची निवड झाली होती. क्रिकेट सोडून अशा प्रकारे देशी खेळाडूला मिळालेली ही पहिलीच जाहिरात असावी.

या पुस्तकामुळे १९७० च्या दशकातील कबड्डी आणि शरीरसौष्ठव खेळातील सुवर्ण क्षणांना उजाळा मिळाला आहे. तसेच या पुस्तकातील अनेक दुर्मिळ फोटो आणि सामन्यांच्या नोंदी क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास विजू पेणकर यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या पत्रकार परिषदेस लेखक संदीप चव्हाण आणि प्रकाशक प्रज्ञा जांभेकर-चव्हाण उपस्थित होते.

या पुस्तकाचे काम गेली दोन वर्षे सुरु होते. घटना आजपासून ५० वर्षापूर्वी घडल्यामुळे त्याचे दस्तावेज मिळवणे अवघड होते. फोटोसाठी दार्जिलिंगपासून सोलापूर-सांगलीपर्यंत शोधाशोध करावी लागली. अनेक क्रीडा संघटकांनी त्यांच्याकडील दिलेल्या नोंदीची सांगड घालत हा ‘योद्धा’ साकारला असे संदीप चव्हाण यांनी सांगितले.

संघर्ष करणार्‍या प्रत्येक खेळाडूसाठी विजू पेणकर यांचा हा प्रवास प्रेरणादायी ठरेल असा विश्वास प्रकाशक प्रज्ञा जांभेकर – चव्हाण यांनी व्यक्त केला. आमच्या सदामंगल पब्लिकेशनच्या दोन  पुस्तकांना राज्यशासनाचे उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीसाठीचे पुरस्कार मिळाले आहेत. आजवर सदामंगल पब्लिकेशन यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.


हेही वाचा: लहान मुलांच्या लसीकरणासाठी सरकार आग्रही, राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य