Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र "विचारांची लढाई विचारांनी लढावी..." अजित पवारांचा राजकीय पक्षांना सल्ला

“विचारांची लढाई विचारांनी लढावी…” अजित पवारांचा राजकीय पक्षांना सल्ला

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केले आहे. "विचारांची लढाई विचाराने लढावी", असे मत व्यक्त करत त्यांनी राजकीय पक्षांचे प्रमुख, पक्षाचे कार्यकर्ते यांना सल्ला दिला आहे.

Threat to Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून तर फेसबुकवर “शरद पवार तुमचा दाभोलकर होणार” असे पोस्ट करत धमकी देण्यात आली. यानंतर तत्काळ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिष्टमंडळासह मुंबईच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तर या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. या प्रकरणी आता राजकीय स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. या प्रकरणी आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील मत व्यक्त केले आहे. “विचारांची लढाई विचाराने लढावी”, असे मत व्यक्त करत त्यांनी राजकीय पक्षांचे प्रमुख, पक्षाचे कार्यकर्ते यांना सल्ला दिला आहे.

पुण्यातून पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, “तुमचाही दाभोलकर होणार अशी जीवे मारण्याची धमकी शरद पवारांना देण्यात आली आहे. ते कोणाचं अकाऊंट आहे याची माहिती घेतली. सौरभ पिंपळकरच्या ट्विटर अकाऊंटवर हे ट्वीट केलं आहे. त्याच्या ट्वीटरच्या बायोमध्ये तो भाजपा कार्यकर्ता असल्याचं लिहिलं आहे. आता तो खरंच भाजपाचा कार्यकर्ता आहे का? हे मला माहिती नाही. त्यांच्या पक्षाने असं बोलायला लावलं आहे का?,” असे म्हणत अजित पवारांनी प्रश्न उपस्थित केले.

- Advertisement -

तर, “विचारांची लढाई विचारांनी केली पाहिजे. अधिकाराचा गैरवापर कशाला करायचा? कारण नसताना एका राष्ट्रीय नेत्याबद्दल अशाप्रकारे बदनामीकार बोलण्याचा अधिकार कोणी दिला.? सुप्रियाने याबद्दल तक्रार केलेली असेल. मी मुख्यमंत्र्यांची माहिती घेतली तर ते दोन ते तीन दिवस बाहेर गेल्याची माहिती मिळाली.उपमुख्यमंत्र्यांना फोन केला पण लागला नाही,” अशी माहिती अजित पवारांकडून यावेळी देण्यात आली.

सौरभ पिंपळकरचा मास्टरमाइंड कोण, त्याने मोबाइलवरुन कोणाशी संपर्क केला याची माहिती मिळाली पाहिजे. कारण नसताना इतर राजकीय पक्षांच्या नेत्याची बदनामी करायची, त्यांची जनमानसातील प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार करायचा. या गोष्टींचा मी धिक्कार करतो. मी माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो त्यांनी चुका केल्या म्हणून आपण करता कामा नये. तर पक्षश्रेष्ठींनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना याबाबत सांगावे, असे अजित पवारांकडून यावेळी सांगण्यात आले.

बातमी देताना ती खरी की खोटी हे तपासा…

- Advertisement -

यावेळी अजित पवार यांनी शरद पवार यांच्या नावे खोटी बातमी देण्याऱ्या वृत्तवाहिनीला देखील खडेबोल सुनावले. “अलीकडे सोशल मीडियावर काहींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. काही पक्षांबाबत, नेत्यांबाबत लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. उदाहरण म्हणजे शरद पवार यांनी एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीनगरला औरंगाबादच म्हणणार अशी खुशाल चुकीची बातमी एका वृत्तवाहिनीने दिली. शरद पवार इतकी वर्षं काम करत असताना चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. दिलगिरी व्यक्त करण्याआधी बातमी खरी आहे की खोटी हे तपासलं पाहिजे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -