शरद पवारांच्या पावसातील भाषणावरून अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल सल्ला; म्हणाले…

sharad pawar and ajit pawar

मुंबई – विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात होता. अतीतटीच्या ठरलेल्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. शिवसेना-भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेस अशी थेट लढत होती. त्यामुळे राज्यात पुन्हा युतीचं सरकार येणार की सत्तांतर होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र, या निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील समीकरणे बदलली आणि नाट्यमय घडामोडी घडत अभूतपूर्व अशी महाविकास आघाडी स्थापन झाली. शिवेसना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी आपले जुने राजकीय मतभेद बाजूला सारत सत्ता स्थापन केली. या महाविकास आघाडीचे श्रेय जाते ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे. याच निवडणुकीच्या प्रचारावेळी १८ ऑक्टोबर २०१९ रोजी केलेलं पावसातील भाषण या सत्तास्थापनेसाठी लकी पाँईंट ठरला आणि त्यानंतर पावसातील भाषणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. याच पावसातील भाषणाचा दाखला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना स्फुल्लिंग चेतवलं. ऊन, पाऊस, वारा, असला तरीही सभा दणक्यात घ्या. कारण, पावसात घेतलेल्या सभांचा आपल्याला फायदाच होतो, असं आज त्यांनी मिश्किलपणे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं.

हेही वाचा – कार्यकर्त्यांनो कामाला लागा, सभा ओसंडून वाहिली पाहिजे; मविआ कार्यकर्त्यांना पवारांचं आव्हान

ऊन, पाऊस, वादळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस काहीही असलं तरीही महाविकास आघाडीची सभा होणारच आहे. कोणत्याही आपत्तीमुळे सभा थांबणार नाही, असं सांगत असतानाच पावसात सभा झाली की फार फायदा होतो, असं म्हणत अजित पवारांनी हशा पिकवला. २०१९ च्या निवडणूक प्रचारावेळी शरद पवारांचं पावसातील भाषण गाजलं होतं, त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे वक्तव्य केलं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये सभा होती. या सभेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रभर घेण्यात येणाऱ्या सभांचा आढावा घेण्यात आला.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मोठी तयारी सुरू केली आहे. एप्रिल महिन्यापासून महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून संयुक्तपणे महाराष्ट्रभर सभा घेण्यात येणार आहे. मराठवाड्यातून या सभेला सुरुवात होणार आहे. ऊन, पाऊस, वादळ, अवकाळी पाऊस काहीही असो या सभा होणारच. या सभा टोलेजंग झाल्या पाहिजे. सभा ओसंडून वाहिल्या पाहिजेत, असा षड्डू अजित पवारांनी कार्यकर्त्यांना ठोकला.

अजित पवार म्हणाले की, २ एप्रिलपासून मोठ्या सभा घ्यायच्या आहेत. उद्धव ठाकरेंची खेडला ज्याप्रमाणे सभा झाली त्याचप्रमाणे मालेगावातही सभा होणार आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीच्याही सभा झाल्या पाहिजेत. त्यानुसार, २ एप्रिलपासून महाविकास आघाडीच्या सभा होणार आहेत. जिथं तिथं महाविकास आघाडीच्या महाप्रचंड सभा झाल्या पाहिजेत. या सभांचा परिणाम सर्वदूर झाल्या पाहिजेत. २ एप्रिलपासून मराठवाड्याच्या प्रवेशद्वारापासून या सभेला सुरुवात होणार आहे.

या सर्व सभा सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या सभा कुठे घ्यायच्या. कोणते दोन प्रतिनिधी बोलणार हे तिथे नेमून दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं आहे. सभेचे प्रतिनिधी कोणीही असले तरीही महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन ही सभा यशस्वी करायची आहे, असं अजित पवार म्हणाले. तसंच, या सभांसाठी जागा मोठी असली पाहिजे. सभा ओसंडून वाहिली पाहिजे. सर्वांत मोठी सभा कुठे होतेय हे पाहणार असून जो ताकदीने सभा करेल त्याला बक्षीस मिळणार आहे. याआधी कधी झाली नसेल आणि यापुढे होणार नाही अशी टोलेजंग सभा आपल्याला करायची आहे, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये स्फुल्लिंग चेतवलं.

कधी कुठे होणार सभा

२ एप्रिल रोजी मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर छत्रपती संभाजीनगर येथे पहिली सभा होणार आहे. या सभेला अंबादास दानवे पुढाकार घेतील. तर, दुसरी सभा १६ एप्रिल रोजी नागपूर येथे सभा होणार असून सुनील केदार या सभेचं प्रतिनिधित्व करणार आहेत. तिसरी सभा महाराष्ट्र आणि कामगार दिन १ मे रोजी राज्याची राजधानी मुंबईत होणार आहे. या सभेचं प्रतिनिधित्व आदित्य ठाकरे यांना देण्यात आले आहे. चौथी सभा १४ मे रोजी पुण्यात होणार असून याचं प्रतिनिधित्व अजित पवारांकडे आहे. २८ मे रोजी कोल्हापूरला सभा होणार असून त्यासाठी सतेज पाटील पुढाकार घेतील. ३ जून रोजी नाशिकमध्ये सभा होईल. तर, यशोमती ठाकरू यांच्या नेतृत्त्वाखाली ११ जून रोजी अमरावतीला सभा होणार आहे.