नवी दिल्ली – राज्यात महायुतीला विक्रमी बहुमत मिळाले आहे. भाजपला 132 जागा, तर शिवसेना शिंदे गटानं 57 जागांवर विजय मिळवला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 41 जागा मिळाल्या. लोकसभेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही पहिली विधानसभा निवडणूक असल्यामुळे अजित पवारांच्या कामगिरीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष राहिले होते. अजित पवारांनी 55 जागा लढत 41 जागांवर विजय मिळवला. यामुळे त्यांची आणि पक्षांची पत आता वाढली आहे. मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आधीच माघार घेतली आहे. त्यांनी या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे. अजित पवार आज दिल्लीत आहेत. मुख्यमंत्री पदावर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेत्यांसोबत त्यांची बैठक होणार आहे. त्याआधी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पक्ष वाढीसाठी यापुढे काम करणार असल्याचे सांगत दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत
अजित पवार यांची दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होणार आहे. आज दिल्लीमध्ये त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यापूर्वी प्रफुल्ल पटेल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी अजित पवार, पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत अजित पवारांनी दिल्ली विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा निवडणूक आयोगाने काढून घेतला आहे. तो परत मिळवण्यासाठी आता अजित पवारांच्या राष्ट्रावादीला विविध राज्यांच्या निवडणुका लढवून मतांचा टक्का आणि जागा वाढवाव्या लागणार आहे. त्यानंतरच त्यांना पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळेल. त्यासाठी आता दिल्ली विधानसभा लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत पक्षाला यश मिळेल आणि गेलेला राष्ट्रीय दर्जा परत मिळेल असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा : Ajit Pawar : ‘CM’पद वाटून घेणार का? प्रश्न विचारल्यावर अजितदादांची मिश्किल टिप्पणी; म्हणाले, “ए एक भाकरी…”
Edited by – Unmesh Khandale