…पण माझ्या तीन बहिणींवर IT च्या धाडी का? अजित पवारांचा संतप्त सवाल

Ajit Pawar

आयकर विभागाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या मालमत्तांवर छापे मारले आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. काहीही संबंध नसताना त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत, असं अजित पवार म्हणाले.

आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांवर छापे टाकले आहेत. हे अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचे असल्याने आज अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. “माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण मला एका गोष्टीचं दु:ख आहे की ज्या माझ्या तीन बहिणी ज्यांची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली आणि त्या चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्या तीन बहिणींवर एक कोल्हापूरमधील बहिणीवर आणि दोन पुण्यातील बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

पुढे बोलताना त्यांनी “या धाडीमागचं कारण मला समजू शकलेलं नाही. कारण त्या त्यांचं जीवन जगतायत, त्यांच्या मुलांची लग्न झाली आहेत, त्यांची नातवंड आहेत. असं असताना अजित पवार यांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्याच्या जनतेनं या गोष्टीचा जरुर विचार केला पाहिजे. कुठल्या स्तारावर जाऊन आज या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातो आहे. बाकीच्या कारखान्यांवर छापा टाकला मला त्याचं काही नाही. पण ज्यांचा काहीच संबंध नाही त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. अनेक सरकार आली आणि गेली पण कुणी एवढ्या कालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतं हे मला आजपर्यंत कळालेलं नव्हतं,” असं अजित पवार म्हणाले.