घरताज्या घडामोडीमग पाच वर्ष कशाला थांबलात?, शेलारांच्या भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापनेच्या वक्तव्यावर अजित पवारांचा...

मग पाच वर्ष कशाला थांबलात?, शेलारांच्या भाजप-राष्ट्रवादी सरकार स्थापनेच्या वक्तव्यावर अजित पवारांचा पलटवार

Subscribe

भाजप आमदार आशिष शेलार यांनी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार स्थापन करण्याबाबत 2017 मध्ये चर्चा झाली होती असे वक्तव्य केलं आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार केला आहे. अशी चर्चा सुरु होती तर मग पाच वर्ष कशाला थांबलात? असा सवालच अजित पवारांनी केला आहे. तसेच अजित पवारांनी मशिदींच्या भोंग्यांवरील कारवाईच्या मागणीवरुनही भाजपवर निशाणा साधला आहे. इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते. आजच ही मागणी का केली जात आहे? असे अजित पवार म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना २०१७ मध्ये राष्ट्रवादी-भाजपच्या युतीबाबत चर्चा झाली होती, अशा आशिष शेलारांच्या वक्तव्याबाबत विचारले होते. शेलारांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, आशिष शेलारांनी 2017 साली हे सांगायचं होतं ना. पाच वर्ष का थांबलात? 2022 मध्ये 2017 साली असं झालं होतं ते सांगायचं. 2017 साली बरेच नेते इकडे तिकडे होते. त्यांची वक्तव्ये तेव्हा वेगळी होती आता वेगळी आहेत. महाराष्ट्राचे प्रश्न आधी पाहू. 2017 ला असं झालं, 2012 ला तसं झालं, 2010 तसं झालं यात कोणाला रस नाही. आज काय आहे, महत्त्वाच्या समस्या कोणत्या, मूलभूत प्रश्न काय ते पाहूया, असं उत्तर अजित पवार यांनी दिलं.

- Advertisement -

आतापर्यंत भाजपला कुणी थांबवलं होतं?

इतके वर्ष सर्व चालत आलेले आहे. आतापर्यंत भाजपला कुणी थांबवले होते. आजच ही मागणी का केली जात आहे? उद्या सुप्रीम कोर्टाने काही आदेश काढला तर सर्व धर्माच्या भाविकांना तो निर्णय लागू होईल, याची खबरदारी सर्वांनी घेतली पाहिजे. भारतातील महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात जातीय दरी निर्माण करुन आज जातीय सलोखा बिघडवण्याचे काम सुरु आहे. नको त्या गोष्टी लोकांच्या मनात आणून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्राला परवडणारा नाही, सर्वांनी गांभीर्याने या गोष्टी घेऊन मनाचा मोठेपणा दाखवावा लागेल असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर..

मनसेला राष्ट्रवादी काँग्रेसची फूस असती तर राज ठाकरेंनी शरद पवारांना जातीयवादी म्हटले असते का? राज ठाकरे आज भाषणे करत असताना ते भाजपवर टीका करत नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरच टीका करतात. मात्र लोकसभेला त्यांचा अजेंडा वेगळा होता. त्यावेळी त्यांनी फक्त भाजपला टार्गेट केले होते. ही वस्तूस्थिती मान्य करावी लागेल. २०१९ ला आघाडीला अप्रत्यक्ष फायदा होईल, अशा पद्धतीने त्यांनी सभा घेतल्या होत्या याची आठवण अजित पवार यांनी करुन दिली.

- Advertisement -

रवी राणा राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार

२०१४ च्या निवडणुकीत नवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार होत्या. त्यांचे पती रवी राणा हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार होते. २०१९ ला पुन्हा रवी राणा आणि नवनीत राणा हे राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार होते, २०१९ ला नवनीत राणा यांना पक्षाने तिकीट दिलेले नव्हते. ज्यांना आपण पुरस्कृत करतो, ते आपल्यासोबतच राहतील का? हे तपासण्याचे आपल्याकडे अजून तरी यंत्र नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे एकत्र सरकार येईल असे कुणालाच वाटले नव्हते. एकेकाळी ममता बॅनर्जी आणि भाजप एकत्र होते, आज ममतादीदी भाजपच्या विरोधक आहेत. बिहारमध्ये नितीश कुमार कधी भाजपसोबत असतात कधी भाजपचे विरोधक होतात. त्यामुळे अशा घटना आपल्या इथेच नाही, तर भारतभर घडत असतात असेही अजित पवार म्हणाले.


हेही वाचा : आयएनएस प्रकरणी सोमय्या पिता-पुत्रांना हायकोर्टाचा दिलासा, १४ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -