घरताज्या घडामोडीरायगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्याच्या पुढे, आरोग्य सुविधांसह टेस्टिंग वाढवण्याचे अजित पवार...

रायगडमध्ये पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्याच्या पुढे, आरोग्य सुविधांसह टेस्टिंग वाढवण्याचे अजित पवार यांच्या सूचना

Subscribe

गुजरातला मदत केली तसेच केंद्राने राज्य सरकारला देखील मदत करावी अशी मागणीम

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार रायगड दौऱ्यावर आहेत. तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकासानीचा आढावा आणि पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे भूमिपूजनाचा कार्यक्रमास उपस्थित राहिले हाते. अजित पवार यांनी रायगडमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटि रेट जास्त असल्यामुळे रायगड दौरा करुन आढावा बैठक घेतली. या बैठकीत रायगडमध्ये जिल्हाधिकारी आणि प्रशासनाला रुग्णालयांचे फायर, इलेक्ट्रिकल आणि ऑक्सिजनचे ऑडिट करुन घ्या अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. रायगडमध्ये दोन ऑक्सिजनचे मोठे प्लांट आहेत त्यातील एक जेएसडब्लूचे आहेत. तसेच कोकणात चक्रीवादळ सातत्याने येत आहे त्यामुळे कायमस्वरुपी उपाययोजनांवर भर देण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोरोना पॉझिटिव्हिटी रेट १० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्ह्याचा दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. अजित पवार यांनी रायगड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आणि चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. यावेळी अजित पवार यांनी रायगडमध्ये कोरोना चाचणीवर भर देण्याच्या सूचना केल्या आहेत. रायगडमध्ये कोरोना चाचणीचे प्रमाण कमी असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढवले पाहिजे तसेच कोरोनावर उपचार करण्यासाठी सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालय तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

रायगडमध्ये जेएसडब्लूचे संचालक जिंदाल यांचे एक रुग्णालय आहे परंतु कोरोनासाठी ते इन्फ्रास्ट्रक्चर करुन दुसरे रुग्णालय उभारणार आहेत. रिलायन्सचे देखील रुग्णालय तयार करणार असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले. पनवेलमध्ये सिडकोचे जम्बो फॅसिलीटी असणारे रुग्णालय उभे करण्याच्या सूचना सिडकोच्या एमडींना दिल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकिय शिक्षणविभागाचे रुग्णालये चांगली सुविधा देत आहेत. तसेच पुढच्या लाटेमध्ये कोणती कमतरता राहू नये यासाठी महाविकास आघाडीने निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे कामाला सुरुवात केली आहे.

कोरोना आटोक्यात आलेल्या ठिकाणी शिथीलता

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने ठरवले आहे की, राज्यात ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे आणि कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांवर आला आहे. अशा जिल्ह्यांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. यानुसार राज्यात ५ टप्प्यामध्ये विभागणी केली आहे. परंतु कोकणाचा विचार केला तर रायगड,रत्नागिरीमध्ये संख्या १० टक्केच्या पुढे आहे. तसेच सातारा,पुणे,सांगली,वर्धा, सिधुदुर्गमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या १० टक्क्यांच्या पुढे आहे. यामुळे या जिल्ह्यांना कोणती कमतरता आहे का? याचा आढावा घेऊन सूचना केल्या जात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

म्यूकमायकोसिसच्या जीएसटीमध्ये सूट

राज्यात म्युकरमायकोसिसचे रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांना लागणारे इंजेक्शन महाग आहे. यामुळे या इंजेक्शनच्या जीएसटीमध्ये काही सूट मिळू शकते का यासाठी गुरुवारी केंद्रीय वित्तविभागाची बैठक घेण्यात आली होती. जी औषध थेट नागरिकांना किंवा रुग्णांच्या नातेवाईकांना घ्यावी लागतात याच्यावर काही दिलासा देता येईल यावर चर्चा झाली आहे. याबाबत केंद्र सरकार निर्णय घेईल असे अजित पवार यांनी सांगितले आहे.

तौत्के चक्रीवादळाचा कोकणाला फटका

कोकणात चक्रीवादळाचे फटके बसत आहेत. गेल्या ४ वर्षात सातत्याने कोकणाला या वादळांचा फटका बसत आहे. यामुळे यावर कायमस्वरुपी उपाय करणे गरजेचे आहे. यासाठी कोकणातील शहरे आहेत त्याची वीज वाहिनी भूमिगत करण्याची गरज आहे. तसेच समुद्र किनारी असलेल्या गजीबो नटबोल्ट काढून ठेवता येतील तसेच नागरिकांसाठी स्थलांतरासाठी इमारती तयार करणे आणि झाडे पडत आहेत त्यामध्ये काही उपाययोजना करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. कोकणाला मदत करण्यासाठी केंद्राची वाट न बघता राज्य सरकारने मदत केली आहे. एनडीआरएफचे निकष बदलून मदत करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. गुजरातला मदत केली तसेच केंद्राने राज्य सरकारला देखील मदत करावी अशी मागणी केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

परदेशात जाणाऱ्या तरुणांचे लसीकरण व्हावे

देशातील तरुण रोजगारासाठी आखाती देशात जात असतात तसेच रायगडमधलेही अनेक तरुण हे परदेशी जातात यामुळे त्यांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्यात यावे अशी सूचना अजित पवार यांनी दिली आहे. त्या तरुणांचे लसीकरण झाले तर ते विनाअडथळा जाऊ शकतील त्या देशात लसीकरणाचे कागदपत्र दाखवू शकतील असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -