घरताज्या घडामोडीअजोय मेहतांना मुदतवाढ नाही, राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती

अजोय मेहतांना मुदतवाढ नाही, राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती

Subscribe

महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील वादानंतर अखेर राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांना मुदतवाढ मिळालेली नाही. त्यामुळे संजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर संजय कुमार यांनी सूत्रे स्वीकारतील, अशी माहिती समोर आली आहे. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे.

- Advertisement -

अजोय मेहता हे सलग तिसऱ्यांदा मुख्य सचिव पदासाठी उत्सुक होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिंब्यामुळे त्यांना ही आशा होती. मात्र, शिवसेना वगळता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष मेहता यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. तशी नाराजी त्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारंवार व्यक्त केली होती. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना मुख्यमंत्री वाचवत असल्याचा दिसून येत असल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेत्यांनी आधी खासगीत आणि नंतर उघडपणे नाराजी व्यक्त केल्याने शेवटी मुख्यमंत्र्यांना त्यांना बाजूला सारावे लागले.

सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत असून १ जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात ६०३ क्रमांकाचे दालन आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक, प्रशासकीय यंत्रणा परत वेगाने सुरू करण्यासाठी व्यापक आणि दीर्घ अनुभव असणाऱ्या व्यक्तीची मुख्यमंत्री सचिवालयात नितांत आवश्यकता असल्याने अजोय मेहता यांना निवृत्तीनंतर प्रधान सल्लागार हे पद देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. १९८४ च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. आता ते प्रामुख्याने कोविडच्या पार्श्वभूमीवर आर्थिक आणि प्रशासकीय यंत्रणा वेगाने कार्यान्वित करण्याची तसेच नव्या औद्योगिक गुंतवणुकीला चालना देण्याची जबाबदारी पार पाडणार आहेत.

- Advertisement -

याआधी सांभाळली होती अनेक खात्यांची जबाबदारी

संजय कुमार यांनी याआधी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, फडणवीस सरकारमध्ये महिला बालविकास विभागाचे ते सचिव असताना चिक्की घोटाळा उघडकीस आला होता. त्यावेळी विभागाकडून असा काही घोटाळा झाला नसल्याचे सांगताना संजय कुमार यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली होती. राज्याचे मुख्य सचिव पदावरून अजोय मेहता यांना दूर सारले तरी ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार राहणार असल्याने ते सत्ता केंद्रात राहणार असल्याने त्यांच्या तालावरच यापुढे राज्य चालणार असल्याची आताच चर्चा सुरू झाली आहे. यामुळे पुढे राज्य एक आणि दोन सचिव अशा पद्धतीने राज्य चालणार का? असा सवाल विरोधी पक्षांकडून आताच केला जात आहे. मेहता यांना एका हाताने दूर केले, पण दुसऱ्या हाताने जवळ करत मुख्यमंत्री विभागाची सूत्रे देत उद्धव ठाकरे यांनी त्यांना जीवदान नव्हे तर ते आपले खास अधिकारी हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त झाल्यानंतर मेहता यांनी मातोश्रीचा विश्वास संपादन केला होता, तो आता कामी आला.


हेही वाचा – भिवंडीत अपयशी ठरलेल्या प्रवीण आष्टीकरांची नाशिक पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी वर्णी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -