घरताज्या घडामोडीअजोय मेहतांना CMO कार्यालयाचा मोह सुटेना

अजोय मेहतांना CMO कार्यालयाचा मोह सुटेना

Subscribe

महारेरात बदलीनंतरही, मेहतांची सीएमओत मिनतवारी सुरूच

राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता यांची नुकतीच ‘महारेरा’च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असली, तरी आजही त्यांची मुख्यमंत्री कार्यालयात मिनतवारी सुरु असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे महारेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती होऊनही मेहता यांची मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार नावाची पाटी मंत्रालयात सहाव्या मजल्यावर तशीच कायम आहे. हे पाहाता महारेरा सोबतच मेहता यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयाचीही जबाबदारी आहे की काय ? अशी मंत्रालयात चर्चा आहे. अजोय मेहता यांनी महारेराच्या अध्यक्षपदाची शपथ नुकतीच गृहनिर्माण मंत्र्यांच्या उपस्थितीत घेतली आहे. अशातच मेहतांचा सीएमओ कार्यालयातला वाढलेला मुक्काम पाहता, मंत्रालयात अजोय मेहतांचे कार्यालय हा सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मेहता यांच्यावर विशेष मेहरबान असल्याचे त्यांच्या नियुक्तीपासून उघड झाले आहे. देवेंद्र फडणीस यांच्या काळात सचिव पदी असलेल्यांना बदलण्यात येऊन त्यांना इतरत्र पाठवण्यात आले. याला अपवाद अजोय मेहता होते. यामुळे मुख्य सचिव पदाचा सर्वाधिक काळ हा मेहतांच्या वाट्याला आला. ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मेहरबानी मानली जाते. आता निवृत्ती होत असताना मेहता यांच्याकडे महारेराची जबाबदारी देण्यात आली आहे.

- Advertisement -

अजोय मेहता यांनी आठ दिवसांपूर्वीच महारेराच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार पद रिक्त झाले आहे. या पदावर अद्याप कुणालाही नियुक्त करण्यात आलेले नाही. अशातच मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील अजोय मेहता प्रधान सल्लागार असतानाची पाटी अद्यापही कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवीन प्रधान सल्लागार नेमणार की अजोय मेहता यांच्याच सल्ल्याने राज्याचा कारभार हाकणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. नवीन प्रधान सल्लागार नेमायचा की अजोय मेहता यांचा सल्ला घ्यायचा, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे महाविकास आघाडीचे नेते खासगीत बोलताना सांगत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा मेहतांना कायम विरोध होता. पण मुख्यमंत्र्यांच्या आग्रहापुढे त्यांचे काही चालले नाही.

राज्याचे विद्यमान मुख्य सचिव संजय कुमार हे येत्या २८ फेब्रुवारीला निवृत्त होत असून, मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे आणि प्रविण परदेशी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. यामध्ये सीताराम कुंटे आघाडीवर आहेत. त्यातच प्रविण परदेशी आणि अजोय मेहता यांच्यामधून विस्तव जात नाही. यामुळे सीताराम कुंटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. सध्याची मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयातील उठबस पाहाता नव्या मुख्य सचिवांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न मेहता करतील असे मुख्यमंत्री सचिवालयात उघडपणे बोलले जाते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -