नाशिकमधील मराठी साहित्य संमेलन पुढील महिन्यात?

स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळांनी व्यक्त केली शक्यता

Akhil-Bharatiya-Marathi-Sahitya-Sammelan

कोरोना संसर्गामुळे गेल्या सात महिन्यांपासून लांबणीवर पडणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नोव्हेंबर महिन्यात घेण्याचा विचार असल्याची माहिती पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी दिली. यापूर्वी तीन वेळा हे संमेलन कोरोना निर्बंधांमुळे पुढे ढकलावं लागलं होतं.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळालाय. पूर्वनियोजित तारखांनुसार २६ ते २८ मार्च २०२१ दरम्यान हे संमेलन नाशिकमध्ये पार पडणार होतं. मात्र, कोरोना संसर्गामुळे संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जाहीर करण्यात आला होता. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले-पाटील यांनी हा निर्णय जाहीर केला होता. दरम्यान, अखिल भारतीय साहित्य महामंडळाने ३ ऑगस्टला कोरोना संपल्यानंतरच संमेलन घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. तत्पूर्वी ढाले-पाटील यांनी जुलैमध्ये पालकमंत्री भुजबळांना पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का, असेल तर तारीख कळवा, असे पत्र पाठवले होते. त्यावर भुजबळांनी आयोजन शक्य नसल्याचं कळवलं होतं.

रुग्णसंख्येचा अंदाज घेऊन तारीख निश्चिती

दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अंदाज घेऊनच संमेलन आयोजनाचं नियोजन केलं जाईल. कारण, आरोग्य मंत्र्यांनी दसरा-दिवाळीनंतर कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे संमेलनाची तारीख आताच जाहीर केली आणि तेव्हा रुग्णसंख्या वाढल्यास पुन्हा संमेलन स्थगितीची नामुष्क ओढवू शकते. आपण आयोजकांना तयारीत राहण्याबाबत सांगितलंय. मात्र, संमेलनाचा निर्णय हा प्रत्यक्ष परिस्थिती पाहून घेतला जाईल.