घरमहाराष्ट्रदुसरे लग्न केल्याने महिलेला १ लाखांचा दंड अन् थुंकी चाटायची शिक्षा प्रकरण,...

दुसरे लग्न केल्याने महिलेला १ लाखांचा दंड अन् थुंकी चाटायची शिक्षा प्रकरण, नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांकडे तक्रार

Subscribe

दुसरे लग्न केलं म्हणून महिलेला एक लाख रुपयांचा दंड आणि पंचांची थुंकी चाटायची शिक्षा जात पंचायतीने सुनावल्याचा धक्कादायक प्रकार अकोला जिल्ह्यातून नुकताच समोर आला आहे. पीडित महिलेला जात पंचायतीने दिलेल्या शिक्षा प्रकरणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे . पत्रात त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे.

असा घडला प्रकार

अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यातील वडगाव गावातील पीडित महिलेने साईनाथ नागो बाबर याच्यांशी २०११ साली विवाह केला होता. पतीच्या जाचाला कंटाळून तिने सन २०१५ मध्ये न्यायालयातून रितसर घटस्फोट घेऊन ते दोघ वेगळे झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने न्यायालयात जाणे तिच्या नाथजोगी जात पंचायतच्या पंचांना मान्य नव्हते. त्यांनी हा घटस्फोट मान्य नसल्याचे सांगून हा निर्णय धुडकावून लावला. दरम्यान पिडीत महिलेने २०१९ मध्ये अनिल जगन बोडखे या घटस्फोटीत व्यक्तीशी पुनर्विवाह केला. हा पुनर्विवाह पंचायतीला मान्य नव्हता, त्यामुळे त्यांनी पिडीत महिलेला १ लाख रूपयांचा दंड केला.

- Advertisement -

अजब शिक्षा देऊन विकृतीचे दर्शन

या घडलेल्या प्रकरणी न्यायनिवाडा केल्यानंतर महाराष्ट्रातील पंचांनी एकत्र येऊन दारु, मटणावर ताव मारला . जात पंचायतीने त्या परिवारास बहिष्कृत केले. पीडित महिलेने पहिल्या नवऱ्यासोबतच रहावे, असा पंचांनी निर्णय कायम ठेवला. यावेळी पंचांनी केळीच्या पानावर थुंकून पीडित महिलेने ती थुंक चाटायची अशी शिक्षा देऊन विकृतीचे दर्शन घडवले आहे

नीलम गोऱ्हेंची गृहमंत्र्यांना तक्रार

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांना एक पत्र लिहिले आहे आणि या प्रकरणी कडक कारवाई करावी अशी विनंती केली आहे. अशा घटना सातत्याने घडत असल्याने कठोरपणे कार्यवाही आणि जातपंचायत कायद्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी योग्य तो निर्णय घ्यावा. जात पंचायतीचे बरेच प्रलंबित प्रश्न असून घटना घडल्यानंतर तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नाही, त्यामुळे गुन्हा दाखल करण्यास विलंब होतो आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे माहिती मिळताच पोलिसांनी स्वतः गुन्हा करावा, अशी मागणी डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -