Sunday, March 16, 2025
27 C
Mumbai
Homeमहाराष्ट्रAkshay Shinde encounter : पळ काढण्यासाठी असे उद्योग केले जात असतील तर..., आव्हाडांचा महायुतीवर निशाणा

Akshay Shinde encounter : पळ काढण्यासाठी असे उद्योग केले जात असतील तर…, आव्हाडांचा महायुतीवर निशाणा

Subscribe

अक्षय शिंदेची चकमक सार्वजनिक दस्तावेज आहे. हे आता जनतेच्या न्यायालयात आहे. त्यामुळे अक्षयच्या आई-वडिलांनी जरी माघार घेतली असली तरी केस अशाप्रकारे न्यायालयातून बाद होईल, असे मला तरी वाटत नाही.

(Akshay Shinde encounter) मुंबई : बदलापूरमधील दोन चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलीस एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता. हे एन्काऊंटर बनावट असल्याचा संशय मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केला आहे. अशातच अक्षयच्या आई-वडिलांनी आता आम्हाला हा खटला चालवायचा नाही, अशी भूमिका घेतली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. न्यायालयाच्या प्रक्रियेपासून पळ काढण्यासाठी असे उद्योग केले जात असतील तर ते निंदनीय आहेत, असे सांगत त्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. (Awhad targets Mahayuti for withdrawing the case)

अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. त्याप्रकरणी अक्षय शिंदे याच्या वडिलांनी याचिकेद्वारे पोलिसांनी बनावट चकमकीत मुलाची हत्या केल्याचा आरोप केला होता. यानंतर अक्षय शिंदेची बनावट चकमकीत हत्या झाल्याचे दंडाधिकारी चौकशीत निष्पन्न झाले होते. याप्रकरणी अक्षय शिंदेच्या मृत्यूस पोलीस वाहनाच्या चालकासह पाच पोलीस जबाबदार असल्याचे सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने 20 जानेवारीला सरकारला दिले होते. तथापि, 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी, हे प्रकरण आम्हाला यापुढे लढवायचे नाही, अशी विनंती अक्षयच्या आई-वडिलांनी न्यायालयाला केली. याबाबत आमच्यावर कोणाचा दबाव नसल्याचेही त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट शेअर केली आहे. अक्षय शिंदेच्या आई-वडिलांनी, हा खटला आम्हाला आता लढायचा नाही, असे न्यायालयापुढे सांगितले. पण, आमच्यासारख्या काही जणांना माहीत होते की, या खटल्यादरम्यान अक्षय शिंदेच्या आई-वडिलांवर प्रचंड दबाव टाकण्यात आला होता. अखेरीस त्या गरीब मायबापाने आपल्या मुलाच्या मृत्यूचे ओझे हृदयावर असतानादेखील घाबरून ही केस मागे घेतली. कुणी एवढे दुधखुळे नसते की, एवढी पुढे गेलेली केस मागे घेतली जाईल. प्रश्न आता असा आहे की, ही केस आई-वडिलांच्या सांगण्यावरून मागे घेतली जाऊ शकते का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ही चकमक खोटी असल्याचे अहवालात सिद्ध झाले आहे. तो अहवाल उच्च न्यायालयाने पोलिसांकडे दिलेला असून पोलिसांच्यावतीने सरकारी वकिलांनी, आम्ही कारवाई करतो, असे न्यायालयातच सांगितले आहे. असे असतानाही गेले अनेक दिवस गुन्ह्याची नोंदच करण्यात आली नाही. त्यामागील कारणच हे होते की, गुन्हा नोंद होण्याच्या आधी अक्षयच्या आई-वडिलांनी माघार घ्यावी. यामध्ये राजकारण आहे हे दृष्टीहीन, मुके-बहिरेही सांगतील. पण, कायदा असा मोडीत काढला जाऊ शकतो का? हा खरा प्रश्न असल्याचे सांगत त्यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे.

आता ही सर्व चकमक सार्वजनिक दस्तावेज आहे. हे आता जनतेच्या न्यायालयात आहे. त्यामुळे अक्षयच्या आई-वडिलांनी जरी माघार घेतली असली तरी केस अशाप्रकारे न्यायालयातून बाद होईल, असे मला तरी वाटत नाही. चकमकच खोटी असल्याचा अहवालच आहे तर त्याच्या आई-वडिलांनी माघार घेऊन चकमक खरी आहे, हे तर सिद्ध होत नाही. त्यामुळेच खोट्या चकमकीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. परिणामी, गुन्हा दाखल करणे पोलिसांना क्रमप्राप्त आहे. यातून पळ काढण्यासाठी जर असे उद्योग केले जात असतील तर ते निंदनीय आहेत. कायदा इतका पायदळी तुडवू नका! अक्षय शिंदेचे भूत तुमच्या मानगुटीवर बसणार हे नक्की, असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. (Akshay Shinde encounter: Awhad targets Mahayuti for withdrawing the case)

हेही वाचा – Sanjay Raut : बेड्या घालून घुसखोरांना परत पाठवत अमेरिकेनं भारताची इज्जत दाखवून दिली – संजय राऊत