दुसऱ्या रांगेत उभे केल्यानंतर शिवरायांनी दरबार सोडला, पण आता……राष्ट्रवादीची बोचरी टीका

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल(रविवार) निती आयोगाची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित होते. परंतु निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंना योग्य स्थान न दिल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केल्यानंतर राजकीय वर्तुळात नव्या वादाला सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार, आमदार अमोल मिटकरी यांच्या टिकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी देखील बोचरी टीका केली आहे.

जयंत पाटील यांनीही निती आयोगाच्या बैठकीतील एकनाथ शिंदे यांच्या स्थानावरून टीकास्त्र सोडलं आहे. औरंगजेबासमोर छत्रपती शिवरायांना दुसऱ्या रांगेत उभं केलं म्हणून त्यांनी ती सभा सोडली. आता आपल्याला तिसऱ्या रांगेत जाऊन उभं राहावं लागत आहे. परिस्थिती किती बदलली आहे, हे पाहायला मिळत आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

रोहित पवार काय म्हणाले?

एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टवरून मांडलं.

अमोल मिटकरींचं ट्विट

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमधून अमोल मिटकरी यांनी औरंगजेबाच्या आग्रा येथील दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांसोबत घडलेल्या प्रसंगाची आठवण करुन दिली आहे. “दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा” हा इतिहास ज्या महाराष्ट्राचा त्याचे स्थान शेवटच्या रांगेत आणि शिवप्रभुंचा स्वाभिमान जेथे उफाळुन आला तो आग्रा दरबार (उ.प्र.) पहिल्या रांगेत? प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो .शिंदे साहेब वाईट वाटले, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईविषयी केलेल्या अवमानजनक वक्तव्याचा वाद ताजा असतानाच आता यामध्ये नव्या वादाची भर पडली आहे. त्यामुळे भाजपची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हेही वाचा : काही अपमान करण्याचा उद्देश नाही, मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे करण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली