घरताज्या घडामोडीसर्वच लोकल एसी होणार? मुंबईकरांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून महत्त्वाचा आदेश

सर्वच लोकल एसी होणार? मुंबईकरांसाठी पंतप्रधान कार्यालयाकडून महत्त्वाचा आदेश

Subscribe

अर्थखात्याकडून मंजुरी मिळताच निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांना लवकरच गारेगार प्रवास करता येणार आहे.

येत्या काळात सर्वच लोकल एसी (AC Local) करण्याचा निर्णय केंद्र सरकार लवकरच घेणार आहे. सुखकर प्रवास प्रकल्प या योजनेला प्राधान्य देण्याचे आदेश पंतप्रधान कार्यालयाकडून (PMO) देण्यात आले आहेत. दरम्यान, हा प्रकल्प २० हजार कोटींचा असून याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीकरता पाठवण्यात आला आहे. अर्थखात्याकडून मंजुरी मिळताच निविदा मागवण्यात येणार आहेत. त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास मुंबईकरांना लवकरच गारेगार प्रवास करता येणार आहे. (All local become AC local soon in mumbai)

हेही वाचा -सीएसएमटी ते गोरेगाव लोकल प्रवास होणार जलद

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून लोकल अपघातांत वाढ झाली आहे. अनेकजण लोकलने लटकून प्रवास करतात, त्यामुळे अपघात होऊन मृत्यूमुखी किंवा जायबंदी होतात. अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रेल्वेकडून एसी लोकल प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र, या एसी लोकलचे भाडे जास्त असल्याने सामान्य प्रवाशांनी याकडे पाठ फिरवली होती. मात्र, एसी लोकलचे भाडे कमी केल्यानंतर आता प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे एसी लोकलच्या फेऱ्या नियमित सुरू केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पाच्या माध्यमातून २३८ वातानुकूलित लोकल खरेदी करण्यात येणार आहेत. याचा लाभ मुंबईसह एमएमआरमधील सर्वच लोकल प्रवाशांना होणार आहे.

महापालिकांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून निर्णय?

- Advertisement -

मुंबईसह ठाणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका येत्या काहीच दिवसांत लागतील. या महापालिकांतर्गत लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विविध प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. त्याचअंतर्गत एसी लोकल सुरू करण्यात येणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

हेही वाचा – मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक

२० हजार कोटींचा खर्च अपेक्षित

या प्रकल्पासाठी २० हजार कोटींहून अधिक खर्च अपेक्षित असून यासाठी निविदा कागदपत्रे तयार करण्यात आली आहेत. हा प्रस्ताव अर्थ खात्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून अर्थखात्याची परवानगी मिळाल्यानंतर तत्काळ निविदा मागवण्यात येणार आहेत, असं वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.

चौथ्या मार्गिकेचेही लवकरच लोकार्पण

बेलापूर-खारकोपर-उरण या मध्य रेल्वेवरील चौथ्या रेल्वेमार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. सप्टेंबरअखेरपर्यंत हे काम १०० टक्के पूर्ण होण्याचे नियोजन आहे. त्यामुळे लवकरच या मार्गाचेही लोकार्पण होण्याची शक्यता आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -