घरठाणे'पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी कायम दक्ष राहावे'; पालिका आयुक्तांकडून आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा

‘पावसाळ्यात सर्व यंत्रणांनी कायम दक्ष राहावे’; पालिका आयुक्तांकडून आपत्कालीन व्यवस्थेचा आढावा

Subscribe

सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची मान्सून पूर्व आढावा बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त बांगर होते.

पावसाळ्यात महापालिकेसह सर्व यंत्रणांचे समन्वयक अधिकारी कायम उपलब्ध हवेत. त्यांचे मोबाईल बंद असू नयेत, नेटवर्कमध्ये नाही, रेंज नाही, मोबाईलचं चार्जिंग संपले अशा कोणत्याही सबबी सांगू नयेत. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी २४ तास आणि सातही दिवस उपलब्ध असणे अपेक्षित आहे, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची मान्सून पूर्व आढावा बैठक ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात नुकतीच झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त बांगर होते.( All systems should remain alert during monsoon Review of Emergency Arrangements by Municipal Commissioner Abhijeet Bangar )

गटाराच्या चेंबरवर झाकण नसेल तर कारवाई

रस्त्यावरील गटाराच्या चेंबरचे झाकण नसल्याने कोणतीही दुर्घटना झाली तर गंभीर कारवाई करण्यात येईल. अशा दुर्घटना टाळणे शक्य आहे. त्यामुळे सगळी गटारे, त्यांच्या जाळ्या, झाकणे यांची तपासणी करून घ्यावी. फुटभर पाणी साचलेले असेल आणि गटाराचे झाकण उघडे असेल तर त्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून याची पाहणी करावी. एकही झाकण उघडे दिसले तर जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

- Advertisement -

मेट्रोसाठी आवश्यक तेवढेच बॅरिकेडींग करावे

शहरात सुरू असलेल्या मेट्रोच्या कामासाठी केलेले बॅरिकेडींग आवश्यक तेवढेच ठेवा. म्हणजे वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल, असे आयुक्त बांगर म्हणाले. लाल बहादूर शास्त्री मार्गावरील मॉडेला नाका चौक ते तीन हात नाका येथील बॅरिकेडींग किमान दोन फुटाने कमी केले तर तिथे कोंडी होणार नाही, असेही आयुक्त म्हणाले. तर घोडबंदर सर्व्हिस रोड वरील कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करून जास्तीत जास्त मार्ग रहदारीसाठी उपलब्ध करून देऊ असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘वीज पुरवठा खंडित होणार असेल तर आधीच कल्पना द्या’

पावसाळ्यात कोणत्याही भागात दुरुस्तीसाठी ठरवून वीज पुरवठा बंद केला जाणार असेल तर ती माहिती जिल्हा, पोलीस आणि महापालिका यांच्या आपत्ती कक्षाला आधी द्यावी. तसेच, आयत्यावेळी वीज खंडित झाली असेल तर कोणत्या भागात वीज नाही, दुरुस्तीला किती वेळ लागेल हेही आपत्ती व्यवस्थापन कक्षाला कळवावे. म्हणजे ती माहिती अत्यावश्यक यंत्रणांना कळविणे सोपे जाईल, असे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.

- Advertisement -

धोकादायक पोल, उघड्या वीज वाहिन्या, डीपी यांची पाहणी करून योग्य ती देखभाल दुरुस्ती केली जावी. नाले सफाई, रस्त्याची कामे यावेळी तेथे महावितरणचा स्थानिक अधिकारी हजर राहील, असे पहावे, असेही आयुक्त म्हणाले.

काही ठिकाणी महापालिकेच्या पोलवरून वायर ओढून वीज पुरवठा करण्यात आलेला आहे. त्यामुळे ते पोल धोकादायक झाले आहेत. तेथे महावितरणचे पोल टाकण्यासाठी मान्यता मिळाली आहे. निविदा प्रकिया सुरू आहे, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा

कौसा, शीळ, डायघर, दिवा या भागात मातीची भरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. या भागात नाले काढण्यासाठी स्थानिक विरोध करतात. तेथे तहसीलदारांनी हस्तक्षेप करून नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा, असे आयुक्त बांगर म्हणाले.

तसेच, मुंब्रा, दिवा, कोपर येथे मातीचे उत्खनन सुरू असल्याने भविष्यात रेल्वे मार्गावर धोका होऊ शकतो, याची महसूल विभागाने नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी सांगितले.

आरोग्य यंत्रणा सतर्क हवी

पावसाळी आजारांवरील औषधे, आपत्कालीन परिस्थतीमध्ये वरिष्ठ डॉक्टरांची उपलब्धता, फिल्ड वर पाठविण्याचे वैद्यकीय पथक याची तयारी ठेवावी. पावसाळी आजारांवरील उपचाराची औषधे, सर्प दंशांवरील उपचार हे सर्व नागरी आरोग्य केंद्रात उपलब्ध असावेत. सगळ्यांना प्रत्येक उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यावे लागू नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच, आशासेविका आणि अंगणवाडी सेविका यांच्याकडे अत्यावश्यक औषधे, ओआरएस यांना साठा द्यावा. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी नागरी आरोग्य केंद्रात यावे लागणार नाही, असेही आयुक्त म्हणाले.

पर्यायी रुग्णालय म्हणून काम करावे

तसेच, सिव्हिल रुग्णालयाचे काम सध्या पूर्ण क्षमतेने सुरू नाही. हे लक्षात घेवून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्थेचे नियोजन करावे. आवश्यकतेनुसार अतिरिक्त डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध करून द्यावेत, असेही आयुक्तांनी सांगितले.

दूषित पाण्याच्या तक्रारींची आजवरची ठिकाणे हेरून त्या भागात पाणी शुद्धीकरणाची औषधे वाटणे, साथीच्या आजारांचे प्रादुर्भाव होणारे विभाग लक्षात घेवून प्रतिबंधात्मक उपाय केले जावेत, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.

टँकर, हातपंप, विहीर अशा स्रोतांमधून घेतले जाणारे पाणी तपासावे. दूषित पाणी असेल तर त्याचा वापर बंद करा, अशी सूचना आयुक्तांनी केली.

( हेही वाचा: पावसाळ्यात रेल्वेवाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करा; पालिका आयुक्तांच्या सूचना )

ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापनाने आयोजित केलेल्या या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उपायुक्त जी. जी. गोदेपूरे, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत, ठाणे जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचे प्रतिनिधी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मध्य रेल्वेचे अधिकारी, महावितरण, आरटीओ, एस टी, टी एम टी, महानगर टेलिफोन निगम, एमआयडीसी, मुंबई मेट्रो, टोरंट वीज कंपनी, महानगर गॅस, इंडीयन रेडक्रॉस, लायन्स क्लब तसेच महापालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -