मुंबई : ठाण्याच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वीच या रुग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी, प्रशासनाच्या या अनागोंदी कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे. शिवाजी हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटल मध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे
श्रीराम जयराम#१७मृत्यू— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 13, 2023
ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यापाठोपाठ आता पुन्हा एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील आणि 4 रुग्ण हे जनरल वॉर्डमध्ये होते. तर काही रुग्णांचे वय 80 वर्षापेक्षा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. त्याचबरोबर सिव्हिल रुग्णालय पुनर्बांधणीसाठी बंद झाल्याने सर्व ताण हा ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयावर येतो. पण रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याचे सांगण्यात येते.
रुग्णालयात पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते. जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशिले लाल केली असती, असे म्हणत सुमारे पाच तास मृतदेह आयसीयूमध्ये ठेवणार्या डॉक्टरांना आव्हाडांनी फैलावर घेतले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे शहराला स्मार्ट सिटी करत असताना, शहर भर कोट्यावधी रुपये खर्च करून रंगरंगोटी करण्यात येत आहे. मात्र, दुसरीकडे याच ठाण्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली होती.
हेही वाचा – ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
या रुग्णालयात आता 17 मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनी ट्विटरवरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ही अतिशय वाईट बातमी आहे, पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला वाटत नाही. दोन दिवसांपूर्वीचे प्रकरण गांभीर्याने घेतले असते तर आज हे घडले नसते, असे ट्वीट त्यांनी केले आहे.
आज टीव्हीसमोर येऊन काहीजण रुग्णालयाची बाजू घेताना दिसत आहेत, हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल, याची जराही भीती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी, असे आव्हाड यांनी म्हटले आहे. ठाण्यातील शिवाजी हॉस्पिटलमध्ये आत येण्याचे सगळे दरवाजे उघडे आहेत, पण जाण्यासाठी फक्त वरचा दरवाजा उघडा आहे… श्रीराम जयराम…, असे ट्वीटही त्यांनी केले आहे. या संपूर्ण प्रकरणाची माहिती द्यावी, तसेच संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करावे, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.