घरताज्या घडामोडीगांजाची शेती करायला परवानगी द्या; कृषिमंत्री सत्तारांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची मागणी

गांजाची शेती करायला परवानगी द्या; कृषिमंत्री सत्तारांच्या दौऱ्यात शेतकऱ्यांची मागणी

Subscribe

नाशिक : शेतमालाला भाव नाही, उत्पादन खर्च भरून निघणे मुश्किल असताना अवकाळी, गारपिटीने शेतकरी पुर्णपणे उध्दवस्त झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकर्‍यांनी जगायचे कसे असा उद्विग्न सवाल करत आता गांजाची शेती करायला परवानगी द्या अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे केली. सत्तार यांनी मंगळवारी (दि. २१) नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. दरम्यान, कृषीमंत्र्यांच्या या दौर्‍यात कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने कृषीमंत्र्यांची पाठ वळताच ५० खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करत शेतकर्‍यांनी आपला रोष व्यक्त केला.

नाशिक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांत झालेल्या अवकाळी, गारपिटीने ८ हजार हेक्टरवरील शेती पिकांना फटका बसला आहे. मात्र अद्यापही शिंदे सरकारमधील एकही मंत्री शेतकर्‍यांच्या बांधावर न गेल्याने विरोधकांनी सभागृहात सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनच दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी शेतकर्‍यांचे जेवढे नुकसान होईल तेवढी भरपाई दिली जाईल अशी घोषणा केली. मात्र अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना मदत न मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. त्यातच कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव आणि आता अस्मानी संकटाने शेतातील उभी पिके आडवी झाल्याने बळीराजापुढे संकट उभे ठाकले आहे. राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर, रानवड येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांशी चर्चा केली.

- Advertisement -

मात्र यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. शेतमालाला भाव नाही, शासनाकडून मदत नाही आता गांजाची शेती करायला परवानगी द्या साहेब अशी मागणी यावेळी शेतकर्‍यांनी केली. मात्र सरकार आपल्या पाठीशी असून निश्चितपणे सरकार मदत करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकर्‍यांना दिले. राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंत शेतकर्‍यांना जेवढी मदत शेतकर्‍यांना मिळाली नाही तेवढी मदत गेल्या सहा महिन्यांत दिल्याचा दावा कृषीमंत्र्यांनी केला. तर माहिती चुकीची निघाली तर कान पकडेन असेही ते म्हणाले. यावेळी बँकांना सक्तीची वसुली करू नये असे आदेश देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी उपस्थित शेतकर्‍यांना दिले. विशेष म्हणजे कृषीमंत्र्यांना यायला उशिर झाल्याने त्यांनी मोबाईलच्या लाईटमध्ये नुकसानीची पाहणी करत दौर्‍याचे सोपस्कार पूर्ण केले. कृषीमंत्र्यांच्या या दौर्‍यात कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने सत्तार यांची पाठ फिरताच पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -