शिकाऊ उमेदवारांना ‘MAPS’अंतर्गत ५ हजार रुपये भत्ता; एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना (Apprenticeship) केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाचा निर्णयाखाली राज्यात दरवर्षी राबविण्यात येते. या शिकाऊ उमेदवारांना महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत ‘MAPS’ अंतर्गत आता दरमहा ‘पाच हजार रुपये’ भत्ता देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता.

औद्योगिक अस्थापनांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांचा विनियोग करून कुशल कारागीरास आवश्यक असलेले प्रशिक्षण देण्यासाठी शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राज्यात दरवर्षी राबविण्यात येते. शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाचा राज्यातील एक लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार असून, यासाठी अंदाजे ७५ कोटीपेक्षा जास्त रुपये व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाकडून वितरित करण्यात आले आहेत.

हेही वाचा – ‘प्रकरण माझ्याकडे येऊ द्या, मी १६ आमदारांना अपात्र करेन’; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांचे सूचक वक्तव्य

सरकारी, निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षण योजनेंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवण्यासाठी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण योजनेला पूरक म्हणून महाराष्ट्र शिकाऊ प्रशिक्षण प्रोत्साहन योजना 2021 मध्ये मंजूर करण्यात आली. सध्या राज्यातील बेरोजगार उमेदवारांच्या संख्या पाहिल्यास शिकाऊ उमेदवारी योजनेची व्याप्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून नवनवीन योजना दरवर्षी आखल्या जात आहेत. याआधी केंद्र शासनाकडून नॅशनल अप्रेंटीसशिप प्रमोशनल स्कीम (NAPS) अंतर्गत संबंधित अस्थापनेला शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेच्या प्रत्येक उमेदवारासाठी प्रतिमहा दीड हजार रुपये भत्ता संबंधित अस्थापनाकडे केंद्र शासनाकडून वर्ग केला जात होता.

राज्यातील तरुणांना रोजगार आणि प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्य शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (MAPS) लागू करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने पुढाकार घेतला आहे. या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीच्या 75 टक्के किंवा रुपये 5 हजार यापैकी जे कमी असेल ते प्रशिक्षणार्थींना दिले जाणार आहेत. या योजनेचा फायदा राज्यातील जवळपास एक लाखांपेक्षा जास्त शिकाऊ उमेदवारांना होणार आहे. राज्य शासनाकडून या योजनेसाठी ७५ कोटींपेक्षा जास्त रक्कम वितरित केली आहे.