घरमहाराष्ट्रदोन टप्‍प्‍यात मंत्रिमंडळ विस्‍तार!

दोन टप्‍प्‍यात मंत्रिमंडळ विस्‍तार!

Subscribe

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधी मंत्र्यांचा शपथविधी, शिंदे सरकारचा मंत्रालयातून कारभार सुरू

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर सर्वांच्या नजरा आता मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच परंतु दोन टप्प्यांत होऊ शकतो. सद्यस्थितीत शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहचला असून त्यावर 11 जुलै रोजी सुनावणी होणार आहे, तर 18 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक होत आहे. त्यानुसार 11 जुलैनंतर पहिल्या टप्प्यात काही मंत्र्यांना शपथ दिली जाईल, तर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर दुसर्‍या टप्प्यात उरलेल्या मंत्र्यांकडे मंत्रीपदाचा कार्यभार सोपवला जाणार आहे. दोन टप्प्यांत मंत्रिमंडळ विस्तार होत असला तरी सगळीच खाती भरली जाणार नाहीत. दोन ते तीन मंत्रीपदे रिक्त ठेवण्याचीदेखील शक्यता आहे.

भाजपने गृह, महसूल, अर्थ आणि नियोजन, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, ऊर्जा, शालेय शिक्षण, अन्न आणि नागरी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, गृहनिर्माण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय, सहकार आदी महत्त्वाच्या खात्यांचा आग्रह धरला आहे. शिंदे गटालाही वित्त आणि नियोजन, वने आणि पर्यावरण ,जलसंपदा, ऊर्जा, कृषी, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा यापैकी काही खाती हवी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकामसह (उपक्रम) सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क ही खाती ठेवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला अन्य कोणती खाती मिळणार याची उत्सुकता आहे.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह ४२ जणांचा समावेश करता येतो. त्यामुळे साधारणतः 4 आमदारांमागे एक मंत्रीपद याप्रमाणे शिंदे गटाला १२ ते १३ मंत्रीपदे मिळू शकतात, तर उर्वरित मंत्रीपदे भाजपच्या वाट्याला येतील. शिंदे आणि भाजपकडून छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांना मंत्रिमंडळात संधी दिली जाईल. भाजपकडून प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधताना आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून आमदारांना मंत्री म्हणून संधी दिली जाईल, मात्र हे करताना भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होऊ शकतो. अशा वेळी मंत्रिमंडळात नव्या चेहर्‍यांना संधी मिळू शकते. तसेच भाजपच्या कोट्यातील मंत्रिमंडळातील 1 ते 2 जागा रिक्त ठेवल्या जाऊ शकतात.

संभाव्य खातेवाटप
शिंदे गट : नगरविकास, सार्वजनिक बांधकाम (उपक्रम), सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, वने, उद्योग, परिवहन, कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन, खनिकर्म, इतर मागासवर्ग विकास, भूकंप आणि पुनर्वसन, राज्य उत्पादन शुल्क, कामगार

- Advertisement -

भाजप : गृह, महसूल, वित्त आणि नियोजन, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, ऊर्जा, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्रामविकास, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, पर्यटन, शालेय शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, अल्पसंख्याक विकास.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्री कार्यालयाचा अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण शिंदे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

शिंदे यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या भव्यदिव्य कार्यालयात पूजा करण्यात आली. यावेळी संपूर्ण कार्यालय आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या नव्या चेंबरमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मोठा फोटो लावण्यात आला आहे. तसेच त्याशेजारी शिंदे यांचे राजकीय गुरू धर्मवीर आनंद दिघे यांचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचेही फोटो या ठिकाणी लावण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मंत्रालयाच्या इमारतीत प्रवेश करताच सर्वप्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंना पुष्पहार अर्पण करीत वंदन केले. त्यानंतर ते मुख्यमंत्री कार्यालयात पोहचले. यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. एकमेकांचे अभिनंदन केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हाताला धरून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत बसवले. यावेळी उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीनेच पहिली स्वाक्षरी केली.

मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदी, अमित शहांना आज भेटणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी दोन दिवसांच्या दिल्ली दौर्‍यासाठी रवाना होणार आहेत. या दौर्‍यात शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. या भेटीत राज्यातील रखडलेल्या प्रकल्पांसह मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होऊन मंत्र्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांचा हा पहिलाच दौरा आहे.

एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेत शिवसेनेत अभूतपूर्व बंड घडवून आणले. मोदी आणि शहा या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांच्या पाठिंब्यामुळे शिंदे यांचे बंड यशस्वी झाले. गुवाहाटीत असताना शिंदे यांनी भाजपचा महाशक्ती असा उल्लेख केला होता. शिंदे यांचे बंड केवळ यशस्वीच झाले नाही, तर त्यांना भाजपच्या पाठिंब्याने थेट मुख्यमंत्रीपद मिळाले. त्यामुळे शिंदे हे दिल्ली दौर्‍यात भाजप नेत्यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानणार आहेत. यावेळी मंत्रिमंडळाचे खातेवाटप आणि संभाव्य मंत्र्यांच्या नावांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश भाजपचे नेते उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, दिल्लीत शुक्रवारी मुक्काम करून एकनाथ शिंदे हे शनिवारी विशेष विमानाने पुण्यात येतील. तेथूनच ते पंढरपूरला रवाना होतील. आषाढी एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठलाची महापूजा करून शिंदे रविवारी मुंबईत येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -