BMC : अमरमहाल ते परळ दरम्यानच्या जलबोगद्याचे एका महिन्यात तब्बल १२५८ मीटर खणन

मुंबई महापालिकेने जानेवारी महिन्यात अमरमहाल ते ट्रॉम्बे जलबोगद्याचे ६५३ मीटर खोदकाम व अमरमहाल ते परळ जलबोगद्याचे ६०५ मीटर खोदकाम असे एकूण १,२५८ मीटर लांबीचे खोदकाम विक्रमी वेळेत पूर्ण केले आहे.
पूर्व उपनगरांमध्ये पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत हे दोन भूमिगत जलबोगदे बांधण्यात येत आहेत. अमरमहाल ते परळ हा सुमारे ९.६८ किलोमीटर लांबीचा भूमिगत जलबोगदा एफ/उत्तर आणि एफ/दक्षिण विभागांमध्ये तसेच ई आणि एल विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यास मदत करणार आहे. तर अमरमहाल ते ट्रॉम्बे उच्च पातळी जलाशयापर्यंत जाणारा दुसरा बोगदा हा सुमारे ५.५२ किलोमीटर लांबीचा असून त्याद्वारे एम/पूर्व व एम/पश्चिम विभागातील पाणीपुरवठा सुधारण्यास मदत होणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या अमरमहाल ते ट्रॉम्बे आणि अमरमहाल ते परळ जलबोगदा प्रकल्प अंतर्गत सलग दुसऱया महिन्यात बोगदा खोदकामांमध्ये विक्रमी कामगिरीची नोंद झाली आहे. वरील दोन्ही बोगदे जमिनीखाली सुमारे १०० ते ११० मीटर खोलीवर बांधण्यात येत असून त्यांचा व्यास ३.२ मीटर इतका आहे. या दोन्ही बोगद्यांमधून येणाऱया भूमिगत जलवाहिन्या ह्या भूपृष्ठावरील मुख्य जलवाहिनी आणि सेवा जलाशय यांना जोडल्या जाणार आहेत.

पालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्प खात्यामार्फत सुरु असलेल्या या भूमिगत जल बोगदा प्रकल्पांच्या खोदकामात नवीन उच्चांक नोंदवण्यात आला आहे. मागील डिसेंबर महिन्यात जल बोगद्याचे ५२६ मीटर खोदकाम करण्यात आले होते. फक्‍त ११५ दिवसांच्‍या कालावधीत १.७ कि.मी. इतके खोदकाम करून तेवढे अंतर पार पाडण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर अमरमहाल ते ट्रॉम्बे या दुसऱया बोगद्याच्या कामामध्ये जानेवारी महिन्यात तब्बल ६५३ मीटर खोदकाम करतेवेळी एकाच दिवसात ४० मीटरपेक्षा अधिक खोदकाम करण्याची कामगिरी एकाच आठवड्यात दोन वेळा करण्याची किमया महापालिकेने साध्य केली आहे. तसेच या मार्गिकेवर ३.१० कि.मी. म्‍हणजेच ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे.

पाणीपुरवठा प्रकल्प खात्याने ही कामगिरी केल्यामुळे बृहन्मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी कौशल्याची सर्वत्र वाखाणणी केली जात आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जलबोगद्यांची कामे वेगाने सुरु असून कोविड विषाणू संसर्ग परिस्थिती असतांना देखील या दोन्ही बोगद्यांच्या कामांमध्ये प्रशासनाने खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे हे दोन्ही भूमिगत जलबोगदे ठरलेल्या मुदतीत म्हणजे अनुक्रमे सन २०२६ आणि २०२४ मध्ये पूर्णत्वास जातील. एवढेच नव्हे तर चेंबूर ते वडाळा या अंतराचा अंशतः बोगदा सन २०२५ मध्ये सुरू होऊ शकेल.


हेही वाचा : विरोधी पक्षनेता सरकारला वठणीवर आणू शकतो हे दरेकरांनी दाखवून दिलं, देवेंद्र फडणवीसांची खोचक टीका